नागपूर : विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या समस्या सुटत नसल्याने ते तक्रार घेऊन राज्यपालांकडे येतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आणि चिंतेची विनम्रपणे उत्तरे देण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठांची आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या कारभारात सुधारणा कराव्यात, अशा स्पष्ट सूचना देत, राज्यपाल रमेश बैस यांनी कुलगुरूंना कानपिचक्या दिल्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित शताब्दी वर्षानिमित्त सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल बैस म्हणाले, विद्यापीठांमध्ये निकाल उशिरा येणे, परीक्षेबाबतच्या समस्या आणि इतर कारणांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार नाही. सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांच्या भरतीकडे विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ३० ते ४० टक्के शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे ते म्हणाले. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये, शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून केले जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षक मूल्यमापन आमच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येदेखील सुरू केले पाहिजे. विद्यापीठांच्या मानांकनाइतकेच शिक्षकांचे मानांकन महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांची निवड करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – “…तेव्हा पाठीवरचे लाठ्यांचे वळ विसरु नका”, राज ठाकरेंचं मराठा आंदोलकांना आवाहन
न्यायमूर्ती सिरपूरकर म्हणाले, कोणताही पुरस्कार हा त्या व्यक्तीच्या कामाला न्याय देणारा असतो. विद्यापीठाने असे हिरे शोधून काढले आणि त्यांना सन्मानित केले याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले.