चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘जीपीएस टॅग’ लावून सोडण्यात आलेल्या ‘एन-११’ या मादी गिधाडाने चक्क पाच राज्यांतून चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले. वाघांसाठी प्रसिद्ध असलेला चंद्रपूर जिल्हा आता गिधाडांसाठीही ओळखला जावू लागला आहे. येथील वाघ पाचशे ते एक हजार किलोमीटरचा प्रवास करून परराज्यात जात आहेत. आता गिधाडही अन्य राज्यात उड्डाण भरत आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन ११’ असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड सध्या तामिळनाडुतील कलसपाक्कम या तालुक्यात पोहोचले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपुरात टोळीयुद्ध पेटले, अंधाधुंद गोळीबारात कुख्यात गुंडाची हत्त्या

निसर्गचक्रात, देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या गिधाडांच्या संवर्धनासाठी ‘बीएनएचएस’ गेली अनेक वर्षे काम करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हरिणायातील पिंजोर येथे ‘बीएनएचएस’ने एक गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पाठीची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे ठेवण्यात आली होती. त्यांना ताडोबा येथील जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पाठीच्या गिधाडांंना ‘जीपीएस टॅग’ लावून ऑगस्ट महिन्यात ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील ‘एन-११’ या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिने ताडोबा ते छत्तीसगड, छत्तीसगड ते गुजरात आणि आणि गुजरात ते तामिळनाडू असा प्रवास केला आहे.

हेही वाचा >>> संजय राऊत यांची ‘ती’ प्रतिज्ञा पूर्ण! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव असे का म्हणाले?

ऑगस्ट महिन्यात या गिधाडाला सोडल्यानंतर त्याने २०० किमी अंतर कापून छत्तीसगडमधील नारायणपूर गाठले. तेथे त्याच्यावर उपचार करून सप्टेंबरमध्ये पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास ६०० किमी अंतर कापत या गिधाडाने गुजरात गाठले. यादरम्यान त्याने महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केले होते. नंतर गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील उच्छल तालुक्यातील जामली गावात हे गिधाड जमिनीवर पडलेले आढळले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून प्रवास केला. गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला. यासंदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gps tagged vulture released from tadoba andhari tiger reserve traveled 4000 kilometers reached tamil nadu rsj 74 zws