नागपूर : एकीकडे तरुणांकडून उच्च शिक्षण घेतले जात असले तरी त्यांच्या हाताला साजेसा रोजगार नाही. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात वर्ग चार संवर्गातील मदतनीसपदी नुकतेच भरती प्रक्रियेनंतर अभियांत्रिकी झालेल्या अभियंत्यासह इतरही पदवी व पदव्युत्तरचे उमेदवार रुजू झाले आहेत. त्यापैकी एकाने रूजू झाल्यावर एक दिवस मदतनीसचे काम करून दुसऱ्याच दिवशी राजीनामाही दिल्याची माहिती आहे. या भरती प्रक्रियेसह त्यात नियुक्तीबाबत आपण जाणून घेऊ या.
वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय आणि त्याच्या अखत्यारित येणाऱ्या इतर संस्थांमध्ये वर्ग चारची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील स्वच्छता, मदतनीसाची कामे यासह इतरही अनेक कामे विस्कळीत होत होती. हा प्रश्न वारंवार पुढे येऊन सरकारची गोची व्हायची. शेवटी हा प्रश्न सोडवण्यासाठी नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने या सर्व महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ६८० पदे भरण्याची प्रक्रिया केली गेली. त्यात नागपूर मेडिकल रुग्णालयातील सर्वाधिक पदांचा समावेश होता.
नागपुरातल मेडिकल रुग्णालयात मागच्या आठवड्यात सुमारे २५ उमेदवार रूजू झाले. त्यात १७ मुली व ४ मुलांचा समावेश आहे. या एकूण उमेदवारांपैकी चौघे जण अभियांत्रिकी (बीई काॅम्प्युटर), दोघे (बीई आयटी), एक जण (बी.काॅम., एलएलबी), एक जण (एमएससी फिजिक्स), एक जण (एमएस्सी पर्यावरण), एक जण (एमएस्सी), एक जण (बीई, इलेक्ट्रिकल) आणि इतरही उमेदवार विविध पदवी व पदव्युत्तरचे उच्च शिक्षण घेतलेले आहेत. या सगळ्यांना सध्या मदतनीस म्हणून मेडिकलच्या आकस्मिक अपघात विभाग, ट्रामा केअर सेंटर, मेडिकलच्या विविध वार्डात मदतनीस म्हणून सेवेवर ठेवले गेले आहेत. एका एमएसीएम झालेल्या मुलीची सेवाही पहिल्या दिवशी एका वार्डात लावली गेली होती. परंतु आपले शिक्षण व करावे लागणारे काम बघून तिने दुसऱ्याच दिवशी प्रशासनाकडे राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे एलएलबी, अभियांत्रिकीसह इतरही मुली व मुले मन मारून वर्ग चारही कामे करत आहेत. परंतु, ही कामे ते किती दिवस करणार हा मोठा प्रश्न आहे. त्यातच मेडिकलमधील काही अधिकाऱ्यांची या मुली-मुलांचे शिक्षण बघून वर्ग चारची कामे देण्याची इच्छा नाही. परंतु, येथे वर्ग चारची रिक्त पदे बघता त्यांना काम दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.