गडचिरोली : काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या तांदूळ घोटाळ्यात अखेर पहिली कारवाई झाली असून सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी निकृष्ट मालाचा पुरवठा करणाऱ्या सहा गिरण्या काळ्या यादीत टाकण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी याबाबतचे आदेश जारी करत दणका दिला. या कारवाईने सामान्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचा तांदूळ मारला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
दत्त राईस मिल कुनघाडा ता. चामोर्शी, मे. श्री. दत्त राईस मिल कोरेगाव ता.देसाईगंज, मे. डांगे राईस मिल देसाईगंज, मे. माहेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीज अमिर्झा ता.गडचिरोली, मे. साई राईस मिल पंदेवाही ता. एटापल्ली, मे. वैनगंगा राईस मिल आष्टी ता.चामोर्शी अशी कारवाई झालेल्या तांदूळ गिरण्यांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी (महसूल) गडचिरोली यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या गोदामात छापा टाकला होता.
गिरण्यांनी भरडाई करुन पाठवलेल्या तांदळाचे नमुने त्यांनी घेतले. ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. यात मानकाच्या प्रमाणापेक्षा तांदूळ अधिक हलक्या प्रतीचे आढळले. त्यामुळे ते खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने पाठवला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू कायदा १९८० /१९५५ कलम ३ (१) व त्यातील सुधारणा २०२० तसेच केंद्र शासनाच्या १६ जुलै २०२१ च्या पत्रानुसार या सहाही तांदूळ गिरण्या तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकल्या आहेत.