संजय मोहिते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : रणरणत्या उन्हात विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार आहे. बुलढाण्यासह विदर्भातील ७२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ मे रोजी होऊ घातल्या आहेत. यामुळे हजारो उमेदवारांसमक्ष उन्हात प्रचार करण्याचे ‘कडक’ आव्हान राहणार आहे.

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणूक असल्यातरी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकांचे आकर्षण अजूनही कायम आहे. यातच सरपंचपदाची थेट जनतेतून निवड होणार आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार हे उघड आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील सव्वासातशे ग्रामपंचायतीच्या लढती होणार आहे. यामध्ये अमरावतीमधील ७५, अकोला ५८, यवतमाळ १३२, वाशीम ५५, बुलढाणा ७७, नागपूर ६९, वर्धा ४९, चंद्रपूर ८३, भंडारा २१, गोंदिया २६ आणि गडचिरोली जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या १०२७ सदस्य तर ४३ सरपंच पदाकरिता या लढती रंगणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

कडाक्याच्या उन्हात रंगणाऱ्या निवडणुकांसाठी २५ ते २ मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पारंपरिक (ऑफ लाईन) पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने उमेदवारांची संख्या जास्त राहणार हे उघड आहे. ३ मे रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून ८ तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याने प्रत्यक्ष प्रचाराला १० तारीख उजाडणार आहे. यामुळे प्रचाराला कमी कालावधी मिळणार आहे. त्यातच जहाल तापमानामुळे संध्याकाळीच प्रचाराला सुरुवात होईल अशी चिन्हे आहेत. १८ तारखेला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान मतदान होणार आहे. गोंदिया, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. १९ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

राज्यातही धूम

ग्रामपंचायतींचा हा रणसंग्राम राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यात रंगणार आहे. ३४ जिल्ह्यातील २६२० ग्रामपंचायतींच्या ३६६६ सदस्य पदाकरिता निवडणूक होऊ घातली आहे. १२६ सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayat by elections in vidarbha held on may 18 scm 61 zws
Show comments