नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप- शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत विधान भवन परिसरात तिळाचे लाडू सहकाऱ्यांना भरवले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी महाविकास आघाडीने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत उपस्थित सहकाऱ्यांना केसरी पेढे भरवले.
राज्यात मंगळवारी ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल लागले. ही मतमोजणी सुरू असतांनाच मंगळवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात विजयोत्सव साजरा करत सोबत असलेल्या भाजपच्या आमदार- पदाधिकाऱ्यांना तिळाचे लाडू भरवले. याप्रसंगी जयकुमार रावल, हर्षवधीन पाटील आणि इतरही भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी बावनकुळे यांनी राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला.
हेही वाचा: भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यामागे ठाण्यातील राजकारण ?
दुसऱ्या दिवशी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधान भवन परिसरात महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला. याप्रसंगी आकडेवारी त्यांनी समोर ठेवली. उपस्थितांना केसरी पेढे भरवले. याप्रसंगी जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अंबादास दाणवे, सचिन अहिर आणि इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे परिसरात भाजपच्या लाडूला राष्ट्रवादीने पेढ्याने उत्तर दिल्याची चर्चा रंगली होती.