नागपूर: ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काटोल मतदारसंघात पक्षाचा एकतर्फी विजय झाल्याचा दावा करत अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतणार, असा दावा माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवारगट) आमदार अनिल देशमुख यांनी केला.
ग्रामपंचायत निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते. देशमुख म्हणाले, खुशाल बोपचे हे शरद पवार यांच्यासोबत आले आहे. त्यामुळे आमदारांची ‘इनकमिंग’ सुरू झाली आहे. इतर आमदारही लवकरच परततील. काही आमदार खासगीत सांगतात की, सत्तेचा फायदा घेण्यासाठी ते अजित पवार यांच्यासोबत आहे. निवडणुका जवळ आल्यावर ते परततील.
हेही वाचा… नागपूर विभागात ‘चिकन गुनिया’चे रुग्ण सहापट; ‘या’ जिल्यात सर्वाधिक रुग्ण
काटोल आणि नरखेड तालुक्यातील बहुतांश जागा राष्ट्रवादीच्या समर्थक उमेदवारांनी जिंकल्याचा दावा केला. यावेळी जि.प. सदस्य सलील देशमुख उपस्थित होते. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा, गुलाल उधळत विजयचा आनंद साजरा केला. देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हवाला देत विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक नागपुरात होणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला. ही बैठक ४ नोव्हेंबरला प्रस्तावित होती. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ती पुढे ढकलल्याचेही त्यांनी सांगितले. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतरच ही बैठक नागपुरात होणार असल्याचेही देशमुख म्हणाले.