लोकसत्ता टीम

वर्धा: वर्धा नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच समाविष्ट होणाऱ्या २७ ग्रामपंचायतींमध्ये विरोधाचे वातावरण सुरू झाले आहे.

महापालिका करण्यासाठी या सर्व ग्रामपंचायतीची माहिती तत्काळ सादर करण्याची सूचना पुढे आल्यानंतर हे विरोधाचे वातावरण तापू लागले आहे. शहराचाच एक भाग झालेल्या नालवाडीचे माजी सरपंच बाळा माऊस्कर यांनी विरोध करण्यात पुढाकार घेऊन साटोडा व अन्य गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध निदर्शनास आणला. महापालिका करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. एकाही ग्रामपंचायतीने ठराव करीत संभाव्य महापालिकेत सामील होण्यास होकार दिलेला नाही.

हेही वाचा… नागपूर: रेल्वेला प्रवाशांच्या झोपेची काळजी, नियमात केले बदल, काय आहेत ते?

महापालिका करण्यासाठी आवश्यक लाेकसंख्या हवी म्हणून नाहक लगतच्या ग्रामपंचायतींना ओढले जात आहे. या ग्रामपंचायती परिसरात राहणाऱ्या ७० टक्के नागरिकांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. महापालिकेचे भविष्यातील कर त्यांना परवडण्यासारखे नाही. मुख्य म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. हा प्रस्तावित निर्णय अंमलात येण्यापूर्वी या ग्रामपंचायतींनी नगरपंचायतचा दर्जा देण्याचे प्रस्ताव सादर केले आहे. या सर्व गावातील गावकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्या, असे साकडे घालण्यात आले आहे.

Story img Loader