लोकसत्ता वार्ताहर
बुलढाणा: ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात ९१ उपकेंद्रासाठी २ हजार सत्तर एकर जमीनिवर ‘सौर क्लस्टर’ निर्माण करून ४१४ मेगा वॅट सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. योजनेत पडीक किंवा ई-क्लास जमीन देऊन सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ लाख रूपयाचे अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा करण्यासाठी कृषी फिडर्सचे सौर ऊर्जीकरण मिशन मोडमध्ये करण्यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या प्रकल्पामुळे कृषी पंपांना दिवसा, अखंडीत वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा… धक्कादायक! सहा वर्षांत ९७८ शेतकरी, मजुरांना फवारणीतून विषबाधा; १५ जणांचा मृत्यू
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर,अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्याकडून संयुक्तपणे वीज उपकेंद्राच्या परिसरात जागेची उपलब्धता करुन देण्यासाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. कार्यकारी अभियंता शशांक पोंक्षे यांच्यामार्फत ७७७ एकर जमीनिचे निश्चितीकरण करण्यात आले आहे.यानंतर जिल्हाप्रशासन व महावितरणकडून करार करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढणार
योजनेकरीता पडिक किंवा ‘ई क्लास’ जमिन उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना १५ लाखाचे उत्सफुर्त अनुदान देण्यात येणार आहे. वर्षाला ५ लाख याप्रमाणे तीन वर्षात हे अनुदान ग्रामपंचायतीला मिळणार आहे. शिवाय सौर प्रकल्प परिसरातील शेतीसाठी दिवसा विजेची सोय होणार आहे.