गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व नवी आणि जुन्या खाणी त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी ७० गावांच्या ग्रामसभांनी निर्णायक संघर्ष पुकारला आहे.सुरजागड परिसरातील दमकोंडी पाहाड (गर्देवाडा ग्रामपंचायत हद्द) येथे पारंपरिक निसर्ग पूजेच्या निमित्ताने हजारो आदिवासी, वननिवासी आणि ग्रामसभा प्रतिनिधींनी एकत्र येत संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे पाहिलेले स्वप्न वादात सापडण्याची चिन्हे आहे.
भविष्यातील जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामसभा, महाग्रामसभा, पर्यावरणप्रेमी नागरिक ,कम्युनिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन तीव्र विरोध करतील. सरकारने आणि कंपन्यांनी जर गडचिरोलीतील खाणकाम त्वरित बंद केले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरतील.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मंजूर आणि सुरू असलेल्या खाणी त्वरित बंद करा, नवीन खाण लिलाव त्वरित थांबवा, जमिनींचा विनाश रोखा, ग्रामसभा आणि महाग्रामसभांच्या संमतीशिवाय कोणत्याही खाणीला मंजुरी देऊ नये. वनहक्क कायद्याच्या संरक्षणाखाली जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी संविधानिक मार्गाने संघर्ष तीव्र करणे. पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या लढ्यात सक्रीय भूमिका घ्यावी. शासन आणि कंपन्यांच्या हस्तक्षेपाला थांबवण्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी. आदिवासी संस्कृती आणि परंपरांच्या रक्षणासाठी सतत संघर्ष करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
ग्रामसभांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर जिल्ह्यातील सर्व खाणी त्वरित बंद करण्यात आल्या नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक, ग्रामसभा ,कम्युनिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संविधानिक आंदोलन उभारतील.
आता मागे हटणार नाही
या बैठकीत ग्रामसभांनी घेतलेल्या ठरावांमुळे संविधानिक मार्गाने लढा आणखी तीव्र करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही केवळ पूजा नव्हती, तर संस्कृतीच्या आणि हक्कांच्या रक्षणासाठी पुकारलेली गर्जना होती. पुढील काळात हा संघर्ष अधिक तीव्र आणि व्यापक होईल, असा स्पष्ट इशारा ग्रामसभांनी दिला आहे.
जल, जंगल, जमीन लुटू दिली जाणार नाही
आमच्या पूर्वजांनी जपलेले हे जंगल आम्ही कधीही नष्ट होऊ देणार नाही. जंगल म्हणजे आमचा प्राण, आमचे जीवन, आमची संस्कृती आहे. कोणत्याही परिस्थितीत जल, जंगल, जमीन लुटू दिली जाणार नाही, असा ठाम इशारा ग्रामसभांनी दिला.