चंद्रपूर : बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी शुक्रवारी (२५ एप्रिल) जिल्हास्तरीय शांतीमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या शांतीमोर्चात बुध्दगया महाविहार मुक्ती आंदोलन समिती, चंद्रपूर अंतर्गत समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटना सहभागी झाले होते.

‘नमो बुध्दाय, जय भीम’च्या घोषणा देत जिल्ह्यातील बौद्ध विहार मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निघालेला भव्य शांती मोर्चा भर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारो बौध्द बांधव सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला. आझाद बगीचा, जटपूरा गेट, प्रियदर्शिनी चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान व बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन देवून बौध्दगया महाविहार व्यवस्थापन किरत असलेल्या बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून बुध्दगया महाबोधी महाविहार भारतीय भिक्कुसंघ आणि भारतीय बौध्द जनतेच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

या मोर्चात भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत अनिरुद्ध थेरो आणि भिक्कुसंघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शांतीमोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे मार्शल अशोक टेंभरे होते. तर सदर शांतीमोर्चात अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, भारतीय बौद्ध महासभाचे किशोर तेलतुंमडे, आनंद वनकर, संदीप सोनोने, समता सैनिक दलाचे अनंत बाबरे, अशोक फुलझेले, आदी सहभागी झाले होते.