अकोला : श्रीराम नवमीनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. सर्वत्र ‘जय जय श्रीराम’चा गजर असून शहर राममय झाले आहे. समद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या उपक्रमात यंदा तब्बल ५१ विविध देखाव्यांचे सादरीकरण केले.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी जागरणासाठी १९८६ मध्ये संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्रीराम नवमी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अकोल्यात सुद्धा शोभायात्रेच्या परंपरेला प्रारंभ झाला. विहिंपच्या संकल्पनेतून दिवंगत आमदार स्व.गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नाने शोभायात्रेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अकोल्यातील शोभायात्रा मध्य भारतातील सर्वात मोठी म्हणून प्रसिद्ध झाली.
४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शोभायात्रा शहरातील एक मोठा महोत्सव झाला आहे. शोभायात्रा समितीद्वारे शहर कोतवाली चौकात भगवान श्रीकृष्ण व कालिया मर्दान नागाचे भव्य चलचित्र देखावा सादर करण्यात आला. हा देखावा गुजरात अंबुजा कंपनीने उभारला. त्यासह कपडा बाजार चौकात सुद्धा धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे.
श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी ५.०० वाजता शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात पादुका पुजन करून शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रा समितीचे सर्व सेवाअधिकारी कृष्णा शर्मा यांच्यासह श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, विहिंपचे महानगर अध्यक्ष प्रकाश लोढीया, समितीचे कोषाध्यक्ष राहुल राठी, विहिंपचे प्रांतमंत्री गणेश काळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
धार्मिक देखाव्यांसह महिला मंडळाचा सहभाग
या शोभायात्रेमध्ये धर्मध्वजासह ११ घोडेस्वार सहभागी झाले. यात बालशिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या. श्रीराम पादुकासह विहिंपचा मानाचा श्रीराम दरबार अग्रस्थानी सहभागी झाला.
धार्मिक तत्वावर ५१ विविध धार्मिक देखाव्यांसह ५० महिला मंडळ, भजनी मंडळ, १० पुरुष वारकरी संप्रदाय दिंडी मंडळ, ढोल पथक आदी शोभायात्रेत सहभागी झाले. शोभायात्रा बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी भाविकांना प्रसाद, पाणी, थंडपेयाचे वाटप केले. शोभायात्रा मार्गावर यात्रेचे स्वरूप आले आहे. शहरातील विविध श्री राम मंदिरांमध्ये जन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला.