बुलढाणा : राज्यपाल रमेश बैस यांच्या धावत्या भेटी निमित्त संतनगरी शेगावात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यावर रमेश बैस हे प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. हा धावता दौरा असून ते काही तासांसाठी शेगावात येणार आहे. आज संध्याकाळी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ते मुंबईकडे रवाना होणार आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आज शनिवारी सकाळी ६ वाजेपासूनच संत नगरीत तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५ तास हा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये उपविभागीय पोलीस दर्जाचे २ अधिकारी व ९ पोलीस निरीक्षक अपर पोलीस अधीक्षकांना सहकार्य करतील. याशिवाय २५ पोलीस उपनिरीक्षक, २५३ पोलीस अंमलदार ,२६ महिला पोलीस तैनात राहणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी ३८ वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – अमरावती: दुचाकीचा स्फोट झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
व्हीव्हीआयपी बंदोबस्त
आज सकाळी ६ वाजेपासून तैनात बंदोबस्त राज्यपाल मुंबईकडे रवाना होईपर्यंत कायम राहणार आहे. आनंद सागर, आनंद विहार, रेल्वे स्थानक व गजानन महाराज मंदिर परिसरात बंदोबस्त जास्त राहणार आहे. त्यामुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी भाविक व नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनकडून देण्यात आले आहे.