लोकसत्ता टीम
अकोला : राज्यातील पदवीधरांना महापारेषणमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सरळसेवेद्वारे महापारेषणमध्ये शेकडो पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून ३ एप्रिल त्याची शेवटची तारीख आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी अशी सात परिमंडल कार्यालये व ऐरोली येथे राज्य भार प्रेषण केंद्र आहे. त्यापैकी सात परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या वेतनगट ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले आहेत.
एकूण २६० रिक्त पदे भरती जाणार असून त्याला सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार आहे. निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. ३४५५५-८४५-३८७८०-११४०-५०१८०-१२६५-८६८६५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल. मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील. या पदासाठी शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेतील पदवी बी.कॉम. व एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता आहे. या पदासाठी अनुभवाची गरज नाही. अर्ज सादर करण्यासाठी ०३ एप्रिलपर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील. माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे इतका राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहणार आहे.
महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील. या पदभरतीसाठी १५० गुणांची ऑनलाइन परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क ठेवण्यात आले. भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी http://www.mahatransco.in या महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.