पर्यावरणपूरक, इथेनॉलवर धावणारी वातानुकूलित ग्रीन बस तोटय़ात गेल्याने कंपनीने ती बंद केली. आता महापालिकेची इलेक्ट्रिक बस शहरात धावणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन इलेक्ट्रीक बसेस दिवाळीनंतर शहरात दाखल होणार आहे. या बसला कसा प्रतिसाद मिळतो, यावर तिचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
इथेनॉलवर धावणारी ग्रीन बस हा भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकोंक्षी प्रकल्प होता. त्यांच्या प्रयत्नामुळेच देशात सर्वात आधी नागपुरात ती सुरू झाली होती. त्यानंतर अनेक राज्यात ही बससेवा सुरू झाली. स्कॅनिया कंपनीच्या माध्यमातून या बससेवचे संचालन केले जात होते. सुरुवातीला या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद चांगला मिळाला, पण तिकीट दर अधिक असल्याने टप्प्याटप्प्याने प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापालिकेला या बसपासून तोटा होत होता. त्यामुळे महापालिकेवर स्कॅनिया कंपनीचे ९ कोटी रुपये थकले. वारंवार मागणी करूनही महापालिकेने ही रक्कम चुकती न केल्याने अखेर कंपनीने बससेवाच बंद केली.
दरम्यान, ही सेवा पुन्हा सुरू व्हावी म्हणून दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्कॅनिया कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात वाडी परिसरातील ६ एकर आणि खापरी परिसरातील ९ एकर जमीन कंपनीला बसपोर्टसाठी देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली. मात्र, कंपनीने थकबाकी तातडीने द्यावी, ही मागणी लावून धरली व ती मान्य न झाल्याने पुन्हा ही सेवा सुरू होऊ शकली नाही. नागपुरात सध्या २४ ग्रीन बसेस असून त्या हिंगणा परिसरात धूळखात पडलेल्या आहे. या बस स्कॅनिया कंपनीला परत करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती आहे.
ग्रीन बसचा प्रयोग फसल्यावर महापालिका दिवाळीनंतर इलेक्ट्रीक बसेस सुरू करणार आहे. यासंदर्भात परिवहन विभाग आणि अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली आहे. दोन बसेस शहरात येणार असून त्या प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस धावतील.
‘‘ग्रीन बस सुरू करण्याबाबत कंपनीशी चर्चा सुरू आहे. यातून काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर ग्रीन बस कंपनीकडे परत पाठवल्या जातील. दिवाळीनंतर दोन इलेक्ट्रीक बसेस शहरात सुरू करण्यात येणार आहेत.’
– बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती, महापालिका