आता कामठीपर्यंत धावणार

नागपूर : नागपूर शहराचा मध्यभाग व उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली.

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे सादरीकरण मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मंत्रालयात सादर करण्यात आले. त्यानंतर या टप्प्याला  मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे नागपूरची मेट्रो आता कामठी, कन्हानपर्यंत धावणार आहे.

मंत्रालयात झालेल्या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. बावनकुळे यांनी कामठीपर्यंत मेट्रो चालावी, यासाठी प्रयत्न केले होते. शहरात मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचा मध्यभाग व उपनगरे जोडली जाणार आहेत. त्यात कामठी शहर आधी जोडले जाणार आहे. कामठीकडे जाणारी मेट्रो ही कन्हानपर्यंत नेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ११ हजार २१६ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यात केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे.

दुसरा टप्पा हा ४८.३ किमीचा असून यात एकूण ३५ स्थानकांचा समावेश आहे. मेट्रोचा पहिला मार्ग  १८.७ किमी आहे. दुसरा मार्ग कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते कामठी कन्हान (१३ किमी), तिसरा लोकमान्यनगर ते हिंगणा (६.६), मेट्रो ४ ए पार्डी ते ट्रान्सपोर्टनगर (५.५), मेट्रो ५ वासुदेवनगर ते वाडी (४.५) असा आहे. मेट्रोच्या टप्पा २ मुळे एकूण ५.५ लाख प्रवासी दर दिवशी प्रवास करण्याएवढी वाहतूक क्षमता निर्माण होणार आहे.

टप्पा दोनची वैशिष्टे

* दुसरा टप्पा -४८.३ किमी.

* एकूण ३५ स्थानिके

* ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी १३ किमी

* लोकमान्य नगर ते हिंगणा ६.६ किमी

* पार्डी ते ट्रान्सपोर्ट नगर ५.५ किमी.

* वासुदेव नगर ते वाडी ४.५ किमी.

Story img Loader