नागपूर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी दीक्षाभूमी, शांतीवन, चिंचोली आणि संविधान चौकात अनुयायांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यासोबत   शहरात विविध ठिकाणी जलसा, सामूहिक वाचन, रक्तदान शिबीर, पुस्तक भेट यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. तर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी अभिवादन कार्यक्रम आयोजित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मंत्री सुनील केदार यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याशिवाय विभागीय आयुक्त प्रजक्ता लवंगरे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर. यांनी देखील दीक्षाभूमीला भेट दिली. संविधान चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध भागातील अनुयायी आले. येथे जलशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बागुल बोलत होते. प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते डॉ. त्रिलोक हजारे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके आदी यावेळी उपस्थित होते.  प्रास्ताविक डॉ. गायकवाड यांनी केले.

दीक्षाभूमी व शांतीवन, चिंचोली येथेही अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे देशातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला वितरित करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच मान्यवरांना बार्टीचे प्रकाशन असलेल्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाची भेट देण्यात आली.

दीक्षाभूमी परिसरात रक्तदान शिबीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व समता सैनिक दल, मुख्यालय दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी परिसरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत शेकडो युवकांनी रक्तदान केले. महापरिनिर्वाणदिना निमित्त मानवंदना म्हणून समता आरोग्य प्रतिष्ठान आणि इतर संघटनांच्या सहकायाने हा उपक्रम राबवण्यात आला.

राष्ट्रवादीकडून अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस मध्य नागपूरचे अध्यक्ष रिझवान अन्सारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भानखेडा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संजय शेवाळे, जावेद खान, रियाज खान, भारत बोधकर यांच्यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.

महापौर  तिवारी यांच्याकडून पुष्पहार अर्पण

नागपूर महापालिकेच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी संविधान चौक स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मोहता विज्ञान विद्याालयातील कार्यक्रम

मोहता विज्ञान विद्याालयातील महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला जय सोमन, डॉ.निखील पाळंदे, कनिष्ठ उपप्राचार्य वंदना अंबाडे, अधीक्षक एस. के. धोटे, पर्यवेक्षक विजय शेंडे, विजय तांदूळकर, व्ही. सी. वैद्या, सचिन दाभणेकर, अविनाश खोलकुटे, मनोज बैस आदी उपस्थित होते. संचालन प्रा. दिनेश कोटांगले यांनी केले.

शिवसेनेकडून आदरांजली

शिवसेना नागपूर संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख नितीन तिवारी आणि दीपक कापसे, सुरेश साखरे यांनी संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन केले. यावेळी मुन्ना तिवारी, बंडू तळवेकर, राजेश वाघमारे, पुरुषोत्तम काद्रीकर उपस्थित होते.

काँग्रेस भवन कार्यालयात प्रतिमा पूजन

शहर काँग्रेसच्या वतीने देवडिया काँग्रेस भवन कार्यालयात त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेभुर्णे, रमन पैगवार, नगरसेवक रमेश पुणेकर, मिलिंद दुपारे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greetings babasaheb ambedkar dikshabhumi ysh