सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शिधा पत्रिकाधारकांना १०० रुपयांत साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेलाचा शिधासंच (आनंदाचा शिधा संच) देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. परंतु, उद्यापासून दिवाळी सुरू होणार असली तरी सर्वत्र साहित्य पोहचलेले नाही. जेथे पोहचले तेथे वाटप सुरू झाले मात्र जिथे सामान अजून पोहचले नाही तेथे प्रतीक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, जिल्ह्यात सर्व दुकानात साहित्य पोहचल्याचा तर शहरात काही दुकानांमध्ये वाटप होत असल्याचा दावा जिल्हा व शहर पुरवठा विभागाने केला आहे. ‘आनंदाचा शिधा संच’ १९ आणि २० ऑक्टोबरपर्यंत जिल्हापातळीवर सर्व रेशन दुकानांवर पोहचवण्यात येईल आणि त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे पुरवठा मंत्र्यांनी मंगळवारी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर याबाबतची माहिती घेतली असता शहरातील मोजक्याच दुकानात हे संच पोहचल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. शिधापत्रिकाधारक जवळच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये याबाबत चौकशी करत आहेत. काही ठिकाणी डाळ पोहचली नसल्याची माहिती आहे. सर्व साहित्य आल्यावरच वाटप केले जाईल सांगण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पांढराबोडीतील दुकानात संचातील काहीच साहित्य पोहचले होते. काही दुकानात सर्व साहित्य आले पण ऑनलाईन प्रक्रिया संथ असल्याने अडचणी आहेत, असे व्यापारी सांगत होते.

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

अंत्योदय व केशरी कार्डधारकांना शिधा संच वाटप केले जाणार आहेत. या लाभार्थ्यांची संख्या नागपूर ग्रामीण भागात ४ लाख ११ हजार तर शहरात ३ लाख ८५ हजार लाभार्थी आहेत. जिल्ह्यात एकूण १४९० दुकाने आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी १४ पैकी ८ साहित्य पोहचले होते. काही ठिकाणी चार पैकी दोन-तीन प्रकारचेच साहित्य प्राप्त झाले. त्यामुळे ग्रामीण भागात ८ ते १० हजार लाभार्थ्यांपर्यत ते पोहचू शकले. शहरातही हीच स्थिती आहे. मागणीच्या तुलनेत कमी साहित्य आल्याने मोजक्याच दुकानात ते उपलब्ध आहे. लाभार्थी रोज दुकानांमध्ये जाऊन विचारणा करतात. धान्य वाटप ऑनलाईन केले जाते. सर्व्हर संथ असल्याने त्याचाही फटका ग्रामीण व शहरी भागातील अनेक दुकांनाना बसत असल्याचे दुकानदार सांगतात. शासनाचे नियोजनही फसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या संगणकाधारित परीक्षेला विरोध ; गैरप्रकाराची विद्यार्थी संघटनांना भीती

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिधा संचात देण्यात येणारे चार प्रकारचे साहित्य पुरवठा करण्याचे काम वेगवेगळ्या व्यक्तींकडे आहे. त्यामुळे सर्व साहित्य न येता वेगवेगळ्या स्वरूपात येत आहे. काही साहित्य आले असून काही येणे बाकी आहे. सर्व साहित्य एका पिशवीत टाकून लाभार्थ्यांना द्यायचे आहे. मात्र, सर्व साहित्य आले नसल्याने दुकानदारांची अडचण होत आहे.यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे म्हणाले. दोन दिवसापूर्वी काही गोदांमध्ये साहित्य पोहोचले नव्हते. पण शुक्रवारी सर्व गोदामात साहित्य आले व त्याचे वाटप सुरू करण्यात आले. शहर पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी मात्र मागणीच्या तुलनेत कमी साहित्य प्राप्त झाल्याचे सांगत प्राप्त साहित्य शक्य तेवढ्या दुकानात पाठवण्यात आले. साहित्य मिळताच इतर दुकानात ते पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grocery package anandachi shidha rs 100 diwali not available ration shops in nagpur district tmb 01