धान्य खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून धान्यविक्रेत्याने दारूत विष टाकून प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना पारडीत उघडकीस आली. संजय सुंदरलाल राऊत (४०, रा. शिवशक्तीनगर, पारडी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीने धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी कळमना मार्केटमध्ये दुकान थाटले होते. अनेक खरेदीदारांकडून त्यांनी धान्य खरेदी केले होते. त्यांची रक्कम देण्यासाठी काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. तर काही शेतकरी किंवा लहान धान्य विक्रेत्यांचे धान्य खरेदीचे पैसे देणे बाकी होते. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात राऊत यांना तोटा झाला. त्यामुळे ते रक्कम परत करू शकले नाही. परिणामी, काही दिवसांपासून ते तणावात होते. संजय यांनी मंगळवारी सायंकाळी दारूमध्ये विष टाकले आणि प्राशन केले. तोंडातून फेस येत असल्यामुळे हा प्रकार पत्नीच्या लक्षात आला. तिने विचारपूस केली. संजय यांनी विष प्राशन केल्याची कबुली दिली. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Story img Loader