लोकसत्ता टीम
गोंदिया : शहरातील एका लॉनमध्ये लग्नाच्या तयारीला वेग आलेला. भारतीय संस्कृतीप्रमाणे बँड-बाजासह निघालेली वरात… या वरातीत वाद्याच्या तालावर थिरकणारे विदेशी पाहुणे अन् नवरदेवाच्या वेशात विदेशी तरुण… शहरवासीयांसाठी ही वरात आकर्षणाचे केंद्र ठरली.
जर्मनीतील रॉबिनने गोंदियातील सॉप्टवेअर इंजिनिअर किरण हिच्याशी हिंदू व भारतीय संस्कृतीनुसार लग्नगाठ बांधली. हा सोहळा विदेशी आणि गोंदियातील नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.
आणखी वाचा-आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढवा म्हणून…
गोंदिया येथील जावळकर कुटुंबातील किरण ही सॉप्टवेअर इंजिनिअर आहे. ती काही वर्षांपूर्वी जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. तेथे रॉबिनशी तिची मैत्री झाली. मैत्रीपूर्ण नात्यातून किरण व रॉबिन यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. परंतु लग्नगाठ मायदेशातील जन्मगावीच आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणेच बांधण्याचा प्रस्ताव किरणने रॉबिनकडे मांडला. या प्रस्तावाला रॉबिनेही मान्य केले.
तुळशी विवाहानंतर लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. गोंदियाच्या जावळकर कुटुंबाला जर्मनीचा जावई मिळणार हे निश्चीत झाले आणि लग्नाची तयारी सुरु झाली. लग्न सोहळ्यासाठी रॉबिन व त्याचे नातलग व मित्र देखील गोंदियात दाखल झाले. हिंदू संस्कृतीप्रमाणे वरात निघाली. वरातीत विदेशी पाहुणे देखील भारतीय वेशभूषा परिधान करून डोक्याला फेटा बांधून सहभागी झाले. ढोलताश्याच्या गजरात थिरकणारे विदेशी पाहूणे पाहुन गोंदियाकरही भारावले. लग्नमंडपात हिंदू संस्कृतीप्रमाणे जर्मनीचा नवरदेव रॉबिन व त्यांच्या विदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर किरण व रॉबिनचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.