चंद्रशेखर बोबडे
नागपूर : ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्रीकडे (ई-कॉमर्स) ग्राहकांचा कल वाढत असला तरी त्याच प्रमाणात या क्षेत्राबाबत तक्रारीही वाढू लागल्या आहेत. पाच वर्षांत ग्राहकांच्या तक्रारींची संख्या देशात तिपटीने व राज्यात दुपटीने वाढली असल्याचे राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ग्राहकांनी केलेल्या तक्रारींच्या संख्येवरून दिसून येते. केंद्रीय ग्राहक संरक्षण खात्याने यासंदर्भात दिलेल्या तपशिलानुसार राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर तक्रार करणाऱ्या देशातील ग्राहकांची संख्या २०१७-१८ या वर्षांत ५९,४०२ होती. २०२१-२२ (जुलै) पर्यंत त्यात १,८३,८५० म्हणजे तिपटीने वाढ झाली. महाराष्ट्रात २०१७-१८ मध्ये ७७९५ ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या, २०२१-२२ मध्ये ही संख्या दुपटीहून अधिक म्हणजे १८,७९९ पर्यंत गेली. ग्राहक तक्रारींबाबत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो, पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे. देशभरातील तक्रारींची संख्या लक्षात घेता या क्षेत्रातील फसवणुकीची तीव्रता लक्षात येते.
ऑनलाइन वस्तू विक्री अन्य सेवा देणाऱ्या देणाऱ्या कंपन्यांचा ‘ई-कॉमर्स’ मध्ये समावेश होतो. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता या क्षेत्राचा गत पाच वर्षांत झपाटय़ाने विस्तार झाला असून अनेक बडय़ा कंपन्या उतरल्या आहेत. काही कंपन्या पारदर्शक व्यवहारामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, तर काही कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचेही आढळून आले. असे झाल्यास ग्राहकांना राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर तक्रार करता येते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून केद्र शासनाने ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम २०२० हा कायदा तयार केला असून त्यानुसार ई-कॉमर्स संस्थांनी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे व आलेल्या तक्रारीचे एका महिन्यात निवारण करणे बंधनकारक आहे.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवरील तक्रारी
वर्ष देश महाराष्ट्र
२०१७-१८ ५९,४०२ ७,७९५
२०१८-१९ ७६,५७० १०,१८०
२०१९-२०२० ९२,४९० ११,८००
२०२०-२१ १,५७,५७४ १८,५६०
२०२१-२२ १, ८३,८५० १८,७९९