भंडारा : स्त्री असो की कोणताही मादी प्राणी, स्त्री व पुरुष बिजांचा संयोग घडल्यास फलित गर्भाची वाढ गर्भाशयात होवून बाळाचा जन्म होतो. गर्भधारणेची सुरुवात फलित अंड्याने होते. साधारणपणे, फलित अंडी गर्भाशयाच्या अस्तराला जुडते व गर्भ गर्भपिशवीत वाढते. गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक तसे नैसर्गिक वातावरण गर्भाशयात असते. ही बाब नैसर्गिक आहे. मात्र अत्यंत दुर्मिळ व वैद्यकशास्त्राला आव्हान देणारी एक घटना साकोली तालुक्यातील विर्शी गावात उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका शेळीला गर्भाशय व पोटाच्याही बाहेर गर्भधारणा झाली. शरीराच्या सर्वच अवयवाच्या बाहेर म्हणजे छातीची पोकळी, पोटाची पोकळी व श्रोणी पोकळीच्या बाहेर शरीराच्या कोणत्याही महत्वपूर्ण अवयवांचे संपर्कात न येता गर्भधारणा होणे हे वैद्यकीय शास्त्रातील नवीन गुपित उघडकीस आले आहे. ही गर्भधारणा कातडीखाली पोटाच्या खालील भागात कासेच्या पुढील काहीसे ढिली असलेल्या चामडीच्या आतील जागेत सबक्युटानिअस गर्भधारणा झाली व पिल्लाची पूर्णपणे वाढही झाली. शेळीने गर्भधारणेचे दिवस म्हणजे एकशेपन्नासपेक्षा जास्त दिवस पूर्ण केले. संपूर्ण जगात आश्चर्यकारक अशी ही घटना म्हणता येईल. वैद्यक व पशुवैद्यकीय शास्त्राला नवीन संशोधन करण्यासाठी एक आव्हान व दिशादर्शक घटना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी जगासमोर आणली आहे.

हेही वाचा – बंड अजित पवारांचे अन् टीकेचे धनी ठरताहेत अमोल मिटकरी; सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली, ‘मिम्स’चा धुमाकूळ

विर्शी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बदली होऊन नव्याने रुजू झालेले डॉ. गुणवंत भडके यांच्याकडे विर्शी येथील शंकर कावळे नावाचे शेतकरी आले. आपल्या शेळीच्या कासेवर सुजन असून कास खुपच कडक झाली आहे व शेळी मागील सहा महिन्यांपासून प्रसूत झाली नाही म्हणून तपासणीसाठी घेऊन आले. साधारणतः शेळीचा गर्भधारणा कालावधी पाच महिन्यांचा असतो. कासेवर सूजन (मस्टायटिस) आहे म्हणून या आधी दोन तीन डॉक्टरांनी त्या शेळीवर औषधोपचार केले होते. परंतु सुजन कमी झाली नव्हती. डॉ. गुणवंत भडके यांनी शेळीची तपासणी केली असता त्यांना कासेच्या (स्तनाच्या) जवळ पोटाखाली सुजन व खराब वास येत असल्याचे लक्षात आले. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. शस्त्रक्रियादरम्यान शेळीच्या गर्भाशयाच्या व पोटाच्या बाहेर मृत असलेले शेळीचे पिल्लू आढळून आले. शेळीच्या कासेला चिपकून पोटाखालील ढिल्या असलेल्या चामडीखाली (जिला वैद्यकीय भाषेत सबक्युटानिअस जागा म्हणतात) हे पिल्लू काहीसे सडलेल्या अवस्थेत मृत आढळून आले.

सबक्युटानिअस असलेले पिल्लू एका आठ एमएम साईजच्या नळीसारख्या छिद्रांमधून रक्तवाहिनिने आतील अवयवाशी जुडलेले होते. परंतु पिल्लाचा मातेच्या शरीराचे आतील कोणत्याही अवयवाशी थेट संपर्क दिसून आला नाही. पिल्लू मृत होण्याचे कारण म्हणजे गर्भधारणा कालावधी पाच महिन्यांपेक्षा जास्त झाल्यामुळे पिल्लू मृत झाला होता. शेतकऱ्याने जर तिला वेळेवर म्हणजे पाच महिन्याच्या आत डॉक्टरांना दाखवले असते तर कदाचित शेळीचा पिल्लू जिवंत मिळाला असता, असे डॉ. गुणवंत भडके यांनी सांगितले.

हेही वाचा – सुवर्णसंधी! ITI व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान नोकरीही मिळणार

दवाखान्यात सोनोग्राफी व ईतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बाकी बाबींचा काही अभ्यास करता आलेला नसला तरी शरीरात बाहेरील कातडीखाली (स्किन) सबक्युटानिअस पिल्लाची पूर्ण वाढ होणे हीच जगातील पहिली आश्चर्यकारक घटना असावी. या संशोधनाचा फायदा कृत्रिम गर्भाशय तयार करण्यासाठी वैज्ञानिकांना नक्कीच होईल. या घटनेने पुढे मादी व नर बिजांच्या संयोगाने फलित झालेल्या गर्भाच्या वाढीसाठी गर्भाशय उपलब्ध नसला किंवा गर्भाशय काही वैद्यकीय व्याधीमुळे उपयोगी नसला तरी शरीरातील ढिली असलेल्या चामडीखाली गर्भाची वाढ करणे शक्य होणार आहे का ? अशा संशोधनाचा नव्याने अभ्यास करावा लागेल, असे मत डॉ. भडके यांनी व्यक्त केले. आता ‘सबक्युटानिअस बेबी’ ही संकल्पना जगापुढे आणल्याचे संपूर्ण श्रेय पशुवैद्यक डॉ . गुणवंत भडके यांना जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Growth of the fetus under the skin a world first and a rare occurrence in medical science ksn 82 ssb
Show comments