Nagpur Breaking News Update Today : दोन गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना नागपूरची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले आहे. बावनकुळे यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीवर खेद व्यक्त करत ४८ वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या घटनेमागे मोरक्या कोण? त्याला शोधून काढू असेही सांगितले. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात सुरू झालेला वाद हा दंगलीपर्यंत गेला आहे. त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांवरच आरोप केला आहे. पोलीस उशीर पोहचल्याने हा सगळा प्रकार घडला असेही ते म्हणाले होते.

बावनकुळेंनी सांगितले सोशल मिडिया ट्रक करणे सुरू…

नागपूरमध्ये जी घटना झाली त्यामध्ये पोलिसांनाही मारहाण झाली आहे. ४८ वाहनांची तोडफोड झाली. शहर शांत ठेवणे आणि समाज माध्यमांवर चुकीच्या बातम्या, अफवा पसरवणे सगळ्यांनी थांबवावे. आम्ही प्रत्येक समाज माध्यमावरील खात्यावर लक्ष ठेऊन आहोत. काहींना ट्रॅक केले जात आहे. काही भागात संचारबंदी लावण्यात आली आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले. सध्या सरकारची भूमिका एवढीच आहे की, हिंदू- मुस्लिम आम्ही एकत्र राहतो. अशी घटना शहरात कधीच घडली नव्हती. ज्यांनी ही घटना घडवण्याचा प्रकार केला त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. जे समाज कंटक शहराला गालबोट लावत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. जनतेने कुणाच्याही भावनिक आव्हानाला बळी पडू नये. मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. त्यानंतर जखमींची भेटही घेणार आहे. घटनेचा मोरक्या कोण? हे शोधणे आवश्यक आहे. शहर शांत करण्याला पहिले प्राधान्य, असेही बावनकुळे यांनी सांगितले.