नागपूर : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेत, असे निर्देश महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. दरम्यान, या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून सुमारे ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंदस्थितीत असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान विषयक टीमने पाहणी करावी
एल अँड टी कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या टीमने याची पाहणी करावी, असे आदेश बावनकुळे यांनी या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित असणारे नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना दिले.
गुन्ह्यांचा शोधासाठी कॅमेरे उपयोगी नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरी, खून, दरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असून, त्यामुळे बंद असलेले कॅमेरे १५ दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेत, अशा सूचना एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही कशी करायची याच्यादेखील सूचना त्यांनी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.