ढोलताशा निनादला, तलवारबाजी व दांडपट्टय़ाची मनोवेधक प्रात्यक्षिके
डीजेच्या झगमगाटात ढोलताशा संस्कृती संपली आहे आणि ती केवळ पुण्यासारख्या शहरातच जिवंत आहे, अशी धारणा सगळीकडे होत चालली होती. या धारणेला छेद देण्याचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून नागपूर शहराने गणेशोत्सवातून शिवसंस्कृतीचे दर्शन घडवणारा ढोलताशा वाजवून सुरूकेली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात आज या पथकाने भगवा फेटा आणि पांढऱ्या सदरात तलवारबाजी आणि दांडपट्टय़ाच्या करामती दाखवल्या. तब्बल तासाभराच्या या करामतीनंतर ढोलताशा निनादला. यावर्षी संपूर्ण शहरातच ठिकठिकाणी शिवसंस्कृतीची पहाट गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूरकरांना अनुभवता आली.
खामला आणि सहकारनगरदरम्यानच्या परिसरात सकाळपासून भाज्यांची रेलचेल असते, त्या परिसरातली सुरुवात आज ढोलताशाच्या निनादाने झाली. शिवाजी महाराजांचे मोठे छायाचित्र आणि आजूबाजूचे वातावरणसुद्धा भगव्या पताकांनी शिवमय झाले होते. सहकारनगर, खामला नववर्ष स्वागत समितीच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त तब्बल दोन तास हिंदू संस्कृतीचे दर्शन घडले. सकाळी ७ वाजता भोसला आखाडय़ातील शागीर्द पुरुष आणि महिलांनी लाठी, दांडपट्टा, तलवारबाजीची मनोवेधक प्रात्यक्षिके करून नागरिकांना खिळवून ठेवले. पांढरा ड्रेस आणि भगवा फेटा अशा वेशात त्या रणरागिणी दिसत होत्या. याचवेशातील पुरुषांनीही शिवसैनिकांची अनुभूती त्यांच्या प्रात्यक्षिकातून दिली. त्यानंतर ८ वाजता शिवमुद्रा या ढोलताशा पथकाच्या प्रदर्शनाने संपूर्ण परिसर निनादला. गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील या पथकाची कौशल्ये नागपूरकरांच्या पसंतीस उतरत आहेत. अवघ्या काही लोकांपासून सुरू झालेल्या या समुहात लहानांपासून तर मोठय़ांची भरती आहे. या पथकातील महिलासुद्धा तेवढय़ाच ताकदीने ढोलताशावर थाप मारतात आणि शिवाजी महाराजांचा तो काळ डोळयासमोर उभा राहतो. तब्बल दीड ते दोन तासाच्या या कार्यक्रमाने नागरिकांनी पुन्हा एकदा पारंपरिक रूपातला गुढीपाडवा अनुभवला. या परिसरासह सक्करदरा आणि बडकस चौकातही पारंपरिक रूपात गुढीपाडव्याची सुरुवात केली. या ठिकाणीसुद्धा या पथकाने त्यांचे कौशल्य दाखवत विसरत चाललेल्या पारंपरिक संस्कृतीला उजाळा दिला. नागरिकांनीही त्यांना तेवढाच प्रतिसाद दिला.
उपराजधानीत पुन्हा शिवसंस्कृतीचे दर्शन
डीजेच्या झगमगाटात ढोलताशा संस्कृती संपली आहे आणि ती केवळ पुण्यासारख्या शहरातच जिवंत आहे,
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-04-2016 at 02:13 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa 2016 celebration with traditional way at nagpur