राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला दिल्याचा प्रकार जनहित याचिकेतून उघड झाला होता. हा मुद्दा आज विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे बघायला मिळालं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अजित पवारांच्या मागणीनंतर महाविकास आघाडीचे इतरही नेते आक्रमक झाले. त्यांनीही अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तारांनी घोटाळा केला आहे की नाही? ते चौकशीतून बाहेर येईल. संबंधित प्रकरणाची चौकशी तरी होऊ द्या, की त्यांना थेट फाशी लावणार?” असा सवाल गुलाबराव पाटलांनी विचारला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.
अब्दुल सत्तारांच्या राजीनामाच्या मागणीबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले, “विरोधीपक्ष सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते ठीक आहे. पण याची तुम्ही पहिली चौकशी करणार की नाही? की थेट फाशी लावणार… आधी चौकशी करा. चौकशीत तथ्य निघालं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. त्यासाठी सरकारचं काम बंद पाडायचं आणि लोकांना मिळणारा न्याय मिळू द्यायचा नाही, ही लोकशाहीमध्ये विधिमंडळाच्या कामकाजाची पद्धत नाही,” अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.
पाटील पुढे म्हणाले, “एकीकडे विधिमंडळाचं कामकाज होऊ द्यायचं नाही आणि दुसरीकडे निषेध करायचा. खाली बसून टाळ्या वाजवायच्या. सरकारला बदनाम करायचं, हे सर्व एक प्रकारचं षडयंत्र आहे. पण हे लोकांच्या मनातलं सरकार आहे, आम्ही चांगल्यापद्धतीने काम करतोय.”