नागपूर : शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित कॅफेच्या समोर लांजेवार नामक गुंडाच्या टोळीने धुडगूस घालून कॅफे मालकावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कॅफेमालक अविनाश राजू भुसारी (२८) गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. कॅफेसमोर अचानक गोळीबार होताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे कॅफे परिसरात गोंधळ उडाला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगर चौकात सोशा नावाचा नामांकित कॅफे पार्लर आहे. या पार्लरमध्ये गेल्या काही दिवसांपासून लांजेवार नावाचा कुख्यात गुन्हेगार आपल्या टोळीसह नियमित होता. मात्र, तो कॅफे मालक अविनाशला नेहमी दमदाटी करून धमकी देत होता. यासोबत अविनाश भुसारी आणि लांजेवार यांच्यात जुना वाद सुद्धा होता. सोमवारी रात्री दीड वाजता वाजताच्या सुमारास लांजेवार हा आपल्या तीन साथीदारांसह सोशा कॅफेत आला. तेथे अविनाश भुसारी आणि निंबस कॅफेचे मालक आदित्य हे दोघेही आईसस्क्रीम खात बसलेले होते. दोन दुचाकींनी आलेल्या लांजेवार व त्याच्या साथीदारांनी अविनाश भुसारी यांच्याशी वाद घातला. वाद वाढताच लांजेवारने आपल्या पाठीमागे लपवलेली पिस्तूल काढून अविनाश वर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवळपास सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या अविनाश ला लागल्या. अचानक कॅफेमध्ये गोळीबाराचा आवाज येताच एकच गोंधळ उडाला. कॅफेतील कर्मचाऱ्यांनी पळापळ केली तसेच आरोपींनीही कॅफेमधून पळ काढला. या घटनेची माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक राऊत यांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. जखमी अविनाशला उत्तर अंबाझरी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला गोळीबार
सोशा कॅफेत सीसीटीव्ही असून कुख्यात लांजेवार आणि अविनाश यांच्यातील वाद विवाद या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर लांजेवारने पिस्तुलातून अंधाधुंद गोळीबार केल्याचेही फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहे.