बुलढाणा : खामगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली. खामगाव नजीकच्या वाडी येथील खासगी वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली असून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अग्निशस्त्र आले कुठून व त्याचा उद्धेश काय? याचा पोलीस तपास करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खामगाव शहर पोलीस ठाणेदार शांतिकुमार पाटील यांना काल रात्री उशिरा ही माहिती मिळाली. गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे मोहन कुरूटले, गणेश कोल्हे, अमर ठाकूर, अंकुश गुरुदेव यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने वाडी परिसरातील सन्मती वसतिगृहाची खोली क्रमांक २०५ गाठली. तिथे असलेल्या नितीन राजू भगत (२२, आंबे टाकळी, ता खामगाव) याच्या साहित्याची त्यांनी तपासणी केली. यावेळी पलंगाखाली असलेल्या एका बॅगमधून शालेय प्रमाणपत्राखाली असलेल्या पिशवीतून पिस्टल सदृश्य देशी कट्टा व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याबद्धल विचारणा केली असता नितीनने उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा – ईडी व भाजपा सरकारच्या धोरणांविरोधात निषेध आंदोलन; चंद्रपूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

यामुळे पंचनामा करून पथकाने त्याला उचलले! त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी नितीन विरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस कसून चौकशी करत आहे. दरम्यान, खामगाव येथील देशी कट्टा जप्त प्रकरणी पोलिसांनी आरोपी नितीन भगत याच्या एका नातेवाईकाला आज ताब्यात घेतले आहे. खामगाव शहर पोलिसांनी काल रविवारी रात्री केलेल्या चौकशी व तपासात ही बाब उघड झाली. यानंतर आरोपी नितीनच्या जवळच्या एका नातेवाईकास गुन्हे शोध पथकाने उचलले. यामुळे प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gun seized from student of a private hostel in wadi near khamgaon scm 61 ssb