अमरावती : गेल्या काही दिवसांपासून चुलीवरचा बाबा म्हणून समाजमाध्यमावर चर्चेत आलेल्या मार्डी येथील गुरूदास बाबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच या बाबाने गावातून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गरम तव्यावर बसून भक्तांना शिव्या हासडत असलेल्या या बाबाची एक चित्रफित समाजमाध्यमांवर चांगलीच प्रसारित झाली.
गरम तव्यावर बसलेल्या या बाबाचे नाव संत गुरूदास महाराज असे असून मार्डी येथे या बाबाचा एक आश्रम आहे. समाज माध्यमांवर प्रसारित झालेली चित्रफित ही महाशिवरात्रीच्या कार्यक्रमातील आहे. आपण अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करीत नाही, आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते, त्यावेळी आपल्याला भान राहत नाही. हा श्रद्धेचा भाग आहे. आपण साधू, संत नाही, असे या बाबाने सांगितले.
हेही वाचा >>> गोंदिया : लग्न दारात अन नवरदेव स्वच्छता अभियानात, नागरिकांकडून कौतुक
समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितीत हा बाबा एका गरम तव्यावर बसलेला आहे. खाली चूल पेटलेली आहे. बाबाच्या हात विडी आहे. विडी ओढत असलेला बाबा पाया पडायला आलेल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत आणि शिव्यांची लाखोली देखील वाहत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या चित्रफितीत बाबा चुलीसमोर लाकडावर बसला आहे. त्या ठिकाणी भोजन तयार करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.
गुरूदास महाराजाचे खरे नाव सुनील कावलकर असे असून तो पुर्वी मजुरीचे काम करीत होता, अशी माहिती समोर आली आहे. पेटलेल्या चुलीवर मोठा तवा ठेवून त्यावर मांडी घालून बसणाऱ्या या बाबाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गरम तव्यावर पाच मिनिटे बसून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. बाबाने हे आव्हान स्वीकारले, तर तीस लाख रुपये देण्याची घोषणा देखील अंनिसने केली आहे. हे आव्हान स्वीकारल्यानंतर बाबाला इजा झाली, तर त्यासाठी बाबा जबाबदार राहील, असे देखील अंनिसने स्पष्ट केले आहे. पण, आव्हान न स्वीकारताच बाबाने गावातून पळ काढला आहे.