सायंकाळची वेळ होती. शंकरपटाचा धुराळा उडाला होता. शंकर पट पाहण्यासाठी आलेले शौकीन ‘हुरर्र, हुरर्र ‘ असे मोठमोठ्याने ओरडत होते. अशातच एक बैलजोडी बिथरली आणि थेट खांबाला जाऊन धडकली. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड प्रसारित होत आहे. ही जोडी होती पट सम्राट अशी ख्याती असलेल्या जगत गुरुजी रहांगडाले यांची. त्यामुळेच या व्हिडिओची चर्चाही चांगलीच रंगली.
हेही वाचा >>>नागपूर: अल्पवयीन मुलीची पोटदुखीची तक्रार अन् गर्भवती असल्याचे झाले निदान; प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
शंकरपट हे भंडारा जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. शतकोत्तर काळापासून जिल्ह्याला शंकर पटाची परंपरा आहे. पटावरील बंदी हटल्यापासून शंकरपटाचा थरार पुन्हा अनुभवायला मिळू लागला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला, धान कापणीनंतर शंकर पटाचे आयोजन केले जाते. काही दिवसांपूर्वी साकोली येथे शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील आणि परराज्यातील बैलजोड्याही या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. पहिल्या फेरीत जगत (गुरुजी) रहांगडाले यांची जोडी देखील स्पर्धेत होती. जगत गुरुजी यांची बैलजोडी प्रसिध्द असून अनेकदा विजेते पदाची मानकरी असल्याचे सांगण्यात येते. यावेळीही स्पर्धा सुरू होताच जगत गुरुजी यांची बैल जोडी धुमशान झाली. मात्र उपस्थितांनी ‘हुरर्र, हुरर्र ‘ असा आरडाओरडा करत दानाच्या जवळ येण्यास सुरवात केली. मार्ग न मिळाल्याने बैलंजोडी समोरच असलेल्या खांबाला जाऊन आदळली. यात बैल आणि गाडा हाकणारा धराशायी झाले. शंकर पटात अशा घटना घडत असतात, बैलांना किंवा बैलजोडी हाकणाऱ्याला कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरूप असल्याचे जगत रहांगडाले यांनी सांगितले.