नागपूर : उत्तरप्रदेशातून नागपुरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी तब्बल ५५ लाखांचा गुटखा तस्करी करून आणला. मात्र, वाडी पोलिसांच्या पथकाने या ट्रकला सापळा रचून कारवाई केली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तो गुटखा तहसीलमधील व्यापारी आणि एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तस्करी करण्यात आल्याची चर्चा आहे.
विशाल सरोज (उत्तरप्रदेश) आणि प्रीन्स वर्मा यांना पोलिसांनी अटक केली. नागपुरात दर महिन्याला कोटी रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा तस्करी करून आणल्या जाते. नागपुरातून संपूर्ण विदर्भात गुटखा पुरविल्या जाते. तस्करांची मोठी साखळी असून या तस्करीला पोलीस ठाण्यातील आणि गुन्हे शाखेच्या पथकासह एनडीपीएस पथकातील काही कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागपुरात एकही कारवाई झाली नव्हती. मात्र, आता नवीन ठाणेदार आल्यामुळे ती साखळी तोडण्यासाठी जोरात कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा – नागपूर : चोरी करण्यापूर्वीच चोरट्यांच्या हातात बेड्या, झाले असे की…
हेही वाचा – पब-बारमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द, नागपूर पोलीस आयुक्तांचे आक्रमक धोरण
उत्तरप्रदेशातून ५५ लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा घेऊन ट्रक शनिवारी सायंकाळी वडधामना हद्दीत पोहोचताच वाडीचे सहायक निरीक्षक राहुल सावंत यांनी छापा घालून ट्रक ताब्यात घेतला. मात्र, गुन्हा दाखल होण्यास तब्बल दोन दिवसांचा अवधी लागल्यामुळे आर्थिक हालचालीविषयी चर्चा रंगली आहे. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तर हर्षल आणि विजय यांच्यासह अन्य तस्करांचा पोलीस शोध घेत आहेत. या तस्करीत एका राजकीय पक्षातील मोठमोठी नावे येत असल्यामुळे वाडी पोलीस दबावात असल्याचे बोलले जात आहे.