महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: नागपुरात २१ आणि २२ मार्चला जी-२० अंतर्गत सी-२० परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात देश- विदेशातील पाहुणे उपस्थित राहतील. ही परिषद जवळ आली असतानाच एकीकडे एच ३ एन २ आणि करोनाचे रुग्ण वाढले, तर दुसरीकडे वातावरण बदलल्याने रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मध्यंतरी नागपूर जिल्हा करोनामुक्त झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या आजाराने डोके वर काढले आहे. १६ मार्चला शहरात १६, ग्रामीण १ असे एकूण १७ रुग्ण होते. त्यापैकी गंभीर संवर्गातील ८ रुग्ण विविध रुग्णालयांत तर ९ सौम्य लक्षणाच्या रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. नागपुरात एच ३ एन २ विषाणूचेही रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत सुमारे पाच रुग्ण विविध रुग्णालयात आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषन समितीच्या बैठकीत हे मृत्यू इतर आजाराने झाल्याचे पुढे आले. त्यामुळे या मृत्यूची नोंद इतर आजारात झाली. सध्या एच ३ एन २ चे दोन रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे वातावरणही बदलले आहे. त्यामुळे एच ३ एन २ आणि करोनाही वाढण्याची शक्यता आहे. या विषयावर सार्वजनिक आरोग्य विभाग, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.

खबरदारी घ्या, आजार टाळा

“बदलते वातावरण विविध आजाराला पोषक आहे. नागपुरात एच ३ एन २ आणि करोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु एच ३ एन २ हा विषाणू तुर्तास गंभीर नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांसह जी- २० परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे. – डॉ. प्रकाश देव, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर.