नागपूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे. विदर्भातील तीन जिल्ह्याला शनिवारी गारपीटीसह झालेल्या वादळी पावसाने झोडपले. हवामान खात्याने दिलेला पावसाचा इशारा खरा ठरला असून अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात शनिवारी काही भागांमध्ये सायंकाळी मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शनिवारी धामणगाव तालुक्यातील तळेगाव, देवगाव, जळका पटाचे ,आसेगाव तसेच यवतमाळ मार्गावरील सर्व परिसरात पावसासह गारपीट झाली. अर्धा तास झालेल्या गारपिटीने या भागातील हरभरा, तूर गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा सुद्धा बंद झाला होता. या भागातील अनेक तूर आणि हरभरा काढण्याचे काम गतीने चालू होते. तसेच गहू सुद्धा शेवटला टप्प्यात होता परंतु ऐन तोंडावर आलेला घास हिसकावून घेतल्याची परिस्थिती या परिसरातील शेतकऱ्यांवर उद्भवली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा शेताचा त्वरित पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात सुद्धा गारपीट झाली. मौजा भिडी विजयगोपल येथे वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस व गारपीट झाली. चना, तुरी, गहु या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. चंद्रपूर शहरात व ग्रामीण भागात वादळ वारा व रिमझिम पावसाने हजेरी लावली. शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली. काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
हेही वाचा… गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी दोन हत्याकांड… उपराजधानातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर
हेही वाचा… आळंदी: छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालून योगी आदित्यनाथ यांचा सत्कार
दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.