वाशीम : जिल्ह्यातील अनेक भागात शनिवार २९ एप्रिलच्या रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रविवारी मंगरूळपीर, कारंजा, मालेगावसह बहुतांश भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून कडक उन्हाळ्याच्या दिवसात पावसाळ्याचा अनुभव जाणवत आहे. संपूर्ण जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. शनिवारी २९ एप्रिल रोजी रात्री सर्वदूर पावसाने हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी रविवारी जिल्ह्यातील मंगरूळपीर, वाशीम, मालेगाव आदी भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका पावसातच पार पडल्या तर अचानक आलेल्या पावसामुळे लग्नमंडळींची धांदल उडाली. जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिके, भाजीपाला व फळबागांचे प्रचंड नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने उन्हाळी पिके, भाजीपाला व फळ लागवड केली. परंतु, सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. प्रशासन पंचनामे करण्याचे सोपस्कार पार पाडत आहे. जिल्ह्यातील कुठलाच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला नाही. त्यामुळे नुकसानीची मदत कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.