बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अकरा आणि नांदुरा तालुक्यातील एक मिळून बारा गावांमध्ये मागील महिनाभरापासून काही नागरिकाचे केसगळती होऊन टक्कल होण्याच्या घटना समोर आलेले आहेत. यातील माटरगाव बुद्रुक या गावातील पाणी पिण्यास व वापरण्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आरोग्य विभागाने माटरगाव ग्रामपंचायतला तसे इशारावजा लेखीपत्र दिले आहे. यामुळे अगोदरच अनामिक आजाराने हवालदील झालेल्या १२ हजार गावकऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.
या गावातील तीन जलस्रोतच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. यात तीन जलस्रोत मधील पाण्यात नायट्रेट चे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे . सामान्य पाण्यात नायट्रेट चे प्रमाण एक लिटरमागे ४५ ग्राम इतके राहते . २९ रुग्ण संख्या असलेल्या या गावातील हेच प्रमाण ५१.७ ते ६१ .४ ग्राम दरम्यान निघाले आहे. ग्रामपंचायत ची विहीर आणि दोन बोअरवेल मधील हे प्रमाण आहे .यामुळे हे प्रमाण पिण्यास आणि वापरण्यास अपायकारक असल्याचे पत्र आरोग्य विभागाने माटरगाव ग्रामपंचायतला दिले आहे . ग्रामविकास अधिकारी आर आर सावरकर यांनी याला दुजोरा दिला आहे .बारा हजार लोकसंख्येच्या या गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात असल्याची महत्वपूर्ण पूरक माहितीही ग्रामविकास अधिकारी आर.आर.सावरकर यांनी दिली आहे .
काय आहे पत्रात?
आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रानुसार २३ जानेवारी अखेर माटरगाव मध्ये केस गळती व टक्कल या विचित्र आणि अनामिक आजाराचे २९ रुग्ण आहे . आरोग्य विभागाने या गावाला होणारा पाणीपुरवठा स्त्रोताच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली असता सदर पाणी हे पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे . याबाबतची माहिती ग्रामपंचायतला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणी नमुने रासायनिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे आढळून आले आहेत. सदर पाणी पिणे तथा वापरणे आरोग्याचे दृष्टीने अपायकारक आहेत. त्यामुळे सदर स्त्रोताजवळ फलक लावून तसेच दवंडीद्वारे नागरिकांस अवगत करावे,अश्या खबरदारीच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहे .