गडचिरोली : एकीकडे सोन्याच्या दाराने उच्चांक गाठलेला असताना चक्क ‘हॉलमार्क’ प्रमाणित बनावट दागिने देत दाम्पत्याने सराफा व्यावसायिकालाच दीड लाख रुपयांनी गंडा घातल्याने सोन्याच्या ‘हॉलमार्क’ प्रमाणित दागिन्यांवर शंका व्यक्त केली जात आहे. शहरात ७ एप्रिल रोजी ही घटना उजेडात आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय संजय हर्षे यांचे चामोर्शी रोडवर सराफा दुकान आहे. ४ एप्रिल रोजी दुपारी   अक्षय हे घरी गेले  होते तर दुकानात वडील संजय वामनराव हर्षे होते. एक दाम्पत्य दुकानात आले, त्यांनी २४.६७० ग्रॅम वजनाची ‘हॉलमार्क’ प्रमाणित साखळी विक्री करुन एक काळी पोत, दोन अंगठ्या व दोन जोड कर्णफुले असे एकूण १ लाख ४५ हजार ५९० रुपयांचे दागिने खरेदी केले.  साखळीवर हॉलमार्क ९१६ असे चिन्ह होते. त्यामुळे संजय हर्षे यांना संशय आला नाही. या साखळीचे सोन्याच्या चालू बाजारभावाप्रमाणे १ लाख ५१ हजार ८९० रुपये झाले. उर्वरित ६ हजार ३०० रुपये हर्षे यांनी संबंधित दाम्पत्यास परत केले. दरम्यान, नंतर साखळीची एक कडी कापून वितळली असता ती बनावट निघाली. त्यानंतर अक्षय हर्षे यांनी गडचिरोली ठाण्यात तक्रार केली.

पडताळणीनंतर कारवाई

दरम्यान, पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले की, सराफा व्यावसायिकाने तक्रार केली आहे. मात्र, त्या साखळीवरील हॉलमार्क चिन्हाबाबत खातरजमा करणे सुरु आहे. हे दागिने पूर्णत: बनावट आहेत की नाहीत, हे पडताळणीनंतर समोर येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सादर

नकली दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याने अयोध्यानगर येथे राहत असल्याचे सांगितले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व साखळी अक्षय हर्षे यांनी गडचिरोली पोलिसांना दिले आहे. या फुटेजआधारे पोलिसांनी संशयित दाम्पत्याचा शोध घेऊन चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.