चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाळेबंदीमुळे मोठय़ा संख्येने आपापल्या राज्यात परतलेल्या  कामगारांमुळे  स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग, व्यवसायात काम मिळण्याची निर्माण झालेली संधी उद्योजकांकडून स्थलांतरितांना परत आणण्याच्या प्रयत्नाने हिरावून घेतली आहे. एप्रिल ते जून दरम्यान विदर्भातील ४४ हजार स्थानिक तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. यापैकी फक्त एक हजार तरुणांच्याच हाताला काम मिळाले. यात नागपूर विभागातील फक्त २३ तरुणांचा समावेश आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस करोनाचा  संसर्ग रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्य़ात रोजगारासाठी आलेले  परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी परतले. अंशत: टाळेबंदी शिथिल झाल्यावर उद्योजकांना कामगार मिळेनासे झाले. त्यामुळे राज्य शासनाने कौशल्य विकास विभागाकडे नोंदणी केलेल्या स्थानिक कुशल व अकुशल कामगारांना संधी देण्याचे ठरवले. तसेच तरुणांना पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. एप्रिल ते जूनअखेपर्यंत १ लाख ७२ हजार १६५ नोकरी इच्छुकांनी नोंदणी केली. यात जुन्या नोंदणीधारकांचाही समावेश होता. यात विदर्भातील ४४ हजार ६९५ ( नागपूर विभाग ३० हजार ४३५ अमरावती विभाग १४ हजार २६०) स्थानिक तरुणांचा समावेश होता. यापैकी आतापर्यंत फक्त १०४५ स्थानिक तरुणांना काम मिळाले. यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ातील फक्त २६ जणांचा समावेश आहे.

मोठय़ा  प्रमाणात स्थलांतर झाल्यानंतर स्थानिक युवकांना रोजगार मिळावा म्हणून शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. कौशल्य विकास विभागाकडे नोंदणी करणाऱ्या कुशल व अकुशल कामगारांना संधी देण्याची विनंती केली होती. शासनाचा निर्णय म्हणून उद्योजकांनी याला प्रतिसादही दिला. स्थानिक लोकांना बोलावलेही. पण प्रतिसाद सकारात्मक न दिसल्याने आणि अनुभवी कामगारांची गरज असल्याने उद्योजकांनी परत गेलेल्यांना पुन्हा बोलावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचा फटका भूमिपुत्रांना बसला.

नागपूर जिल्ह्य़ातील बुटीबोरीत आशियातील सर्वात मोठी एमआयडीसी आहे. तेथील उद्योजकांच्या संघटनेचे प्रमुख (बुटीबोरी असोशिएशन) प्रदीप खंडेलवाल म्हणाले की, सध्या ७० टक्के उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे अनुभवी कामगारांची गरज आहे. त्यामुळे नागपूर सोडून गेलेल्या परप्रांतीय कामगारांना परत आणण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. काही परत आले  तर काही परत येण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही मधल्या काळात स्थानिक युवकांनाही संधी देण्याचा प्रयत्न केला पण ते काम करण्यास तयार नसल्याचा अनुभव आला. आम्हाला सामाजिक दृष्टिकोनापेक्षा  सध्या उद्योग पूर्ववत करायचा आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

विभागनिहाय नोंदणी व प्राप्त रोजगार

(एप्रिल ते जून अखेपर्यंत)

विभाग  संख्या  प्राप्त रोजगार

मुंबई   २४,५२० ३,७२०

नाशिक ३०,१४५ ४८२

पुणे    ३७,५६२ १०,३१७

औरंगाबाद   ३५,२४३ १,५६९

अमरावती   १४,२६० १,०२२

नागपूर ३०,४३५ २३

एकूण   १,७२,१६५   १७,१३३

‘‘उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुभवी कामगारांची गरज असते. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात परत गेलेल्या परप्रांतीय कामगारांना परत बोलावण्याचे आमचे प्रयत्न आहेत. काही आले तर काही येण्याची शक्यता आहे. स्थानिक युवकांनाही आम्ही रोजगार दिला आहे.’’

– प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्यफॅक्चर्स असोसिएशन