समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना समाज कल्याण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ऑगस्ट महिन्यापासून पगार मिळाला नाही. त्यामुळे दिव्यांग शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाला समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
नागपूर आणि जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना गेल्या पाच महिन्यांपासूुन वेतन नाही. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातुन दिव्यांगांना वेतन दिले जात असताना त्यांच्या भोंगळ कारभारामुळे दिव्यांगांना वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली. सरकारकडून पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांची दिवाळी मात्र अंधारात गेली आहे.त्यातच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्यासाठी डेटा पॅक, विजेचे बिल, घरखर्च भागवणे मुश्किल झाले आहे. सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नसल्याने आता आमच्यावर भीक मागण्याची वेळ आली असल्याची भावना दक्षिण अंबाझरी मार्गावरील दिव्यांग शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली.
हेही वाचा : यंदा नागपूर गारठणार!; २४ तासांत तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट
नागपूर शहर व जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑगस्टपासून वेतनच मिळाले नाही. वेतन नसल्याने घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सुद्धा अजुन मिळाली नसल्याचे शिक्षिका मालू क्षीरसागर यांनी सांगितले. शिक्षकांकडून वेतनासंदर्भात न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे वेतन कधी मिळणार असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यात यावे, असे आदेश दिले असताना समाज कल्याण विभागाकडून मात्र त्यांच्या आदेशाचे पालन केले जात नाही, असेही त्या म्हणाल्या.