चंद्रपूर: चिमूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व राजुरा मतदार संघाचे उमेदवार यांना मंचावर स्थान मिळाले नाही. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. प्रधानमंत्री मोदी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अहिर यांनाच स्थान न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्व विदर्भातील नऊ उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा चिमूर येथे मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी झाली. या सभेत पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यातील नऊ उमेदवार मंचावर होते. यामध्ये प्रामुख्याने चिमूर येथील आमदार किर्तीकुमार भांगडिया, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, वरोराचे करन देवतळे, ब्रम्हपुरी येथील कृष्णलाल सहारे, चंद्रपूरचे किशोर जोरगेवार, उमरेड येथील राजू पारवे व इतर उमेदवारांचा समावेश होता. या जाहीर सभेला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर निमंत्रित होते. त्यांची खुर्ची देखील मंचावर लावण्यात आली होती.
मात्र पंतप्रधान यांच्या सुरक्षेतील अधिकाऱ्यांनी तथा पीएमओ हाऊस मधून आलेल्या निर्देशा नुसार अहिर यांना मंचावर स्थान दिले गेले नाही. त्यामुळे अहिर नाराज झाले. परिणामी अहिर सभास्थळ येथून नाराज होऊन निघून गेले. तीच अवस्था राजुरा येथील भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांची झाली. भोंगळे यांचे नाव नऊ उमेदवार यांच्यात नव्हते. तसेच त्यांचे नाव व फोटो देखील मंचावर लावलेल्या बॅनर मध्ये नव्हते. त्यामुळे त्यांना मंचावर प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, भोंगळे सभास्थळ येथून एकटेच निघून गेले. तसेच भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नाव होते. मात्र त्यांचा सभा मंचचा पास बनलेला नव्हता. त्यामुळे त्यांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे ते देखील सभास्थळ येथून निघून गेले.
हे ही वाचा… सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
अहिर यांच्यासह उमेदवारांना सभास्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याची चर्चा भाजप व राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे मोदी यांच्या मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भाटारकर यांना सन्मानाने स्थान दिले गेले.