बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरी जुन्या राशींतीय महामार्ग व मध्य रेल्वेशी जोडलेले तालुक्याचे ठिकाण. दुग्ध व्यवसाय आणि खास करुन दर्जेदार खव्यासाठी दूरवर प्रसिद्ध आहे. मात्र २००१ मध्ये येथे उभारण्यात आलेल्या विशालकाय, गगनचुबी पवन पुत्राच्या मूर्तिमुळे हनुमान नगरी अशी या नांदुऱ्याची नवीन ओळख निर्माण झाली आहे. देशातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती म्हणून या मूर्तिची ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ ने नोंद घेतली आहे.

अमरावती नजीक उभारण्यात येणाऱ्या हनुमंताच्या मूर्तिची चर्चा सुरु झाली आहे. ही मूर्ती महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे १११ फूट उंच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील ही विशाल मूर्ती प्रत्यक्षात १५ वर्षांपूर्वीच उभारण्यात आली आहे. जुन्या राष्ट्रीय महामार्ग सहा लागून असलेली ही गगन स्पर्शी मूर्ती अनेक किलोमीटर दूर अंतरावरून सहज दिसते.

जलाभिषेक अन पूजन

अशी विशाल पार्श्वभूमी असलेल्या या मूर्तिचे दर्शन घेण्यासाठी व हनुमान जयंती निमित्त आज शनिवारी, १२ एप्रिलला नांदुरा शहर परिसरातील शेकडो आबालवृद्ध भाविकांची आज मूर्ती मांदीयाळी जमली. यावेळी विशालकाय हनुमान मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. तसेच विधिवत पूजन करण्यात आले.हनुमान मूर्तीला रिमोट द्वारे अडीचशे किलो वजनाचा आकर्षक व मनमोहक पुष्पहार चढविण्यात आला.

हनुमान जयंती निमिताने याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . गेल्या १५ वर्षांपासून या हनुमान मूर्तीला रिमोट द्वारे सुमारे अडीचशे किलोचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा आहे. यासाठी हार स्वयंचलित वायर रोपवरून रिमोटद्वारे चढवण्यात येतो. हे दृश्य अनेक भाविकानी आपल्या नयनात, हृदयात आणि अर्थात मोबाईलच्या कॅमेऱ्यातही साठवले! या वेळी उपस्थित पवनसुताच्या भाविकांनी ‘ओम नमो भगवते वायुनंदनाय नम:’, बजरंग बली की जय असा गगन भेदी जयघोष केला .

जयंती निमित्त या ठिकाणी आठवडाभर धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या विशालकाय उंच मूर्तीमुळे नांदुरा या गावाला २००१ पासून नवीन ओळख मिळाली आहे, टी म्हणजे “हनुमान नगरी” ही होय!दररोज याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मारोती रायांचा दिवस असलेल्या शनिवारी तर दूरवरून भाविक येथे येऊन रामभक्त हनुमानाच्या विशाल मूर्ती समोर नतमस्तक होतात. आज हनुमान जयंती असल्याने हजारो भक्त याठिकाणी सकाळ पासूनच पूजा अर्चा करण्यासाठी आले आहेत. मोठा उत्साह भाविकांमध्ये दिसून आले.