वर्धा : निसर्गात विविध प्राणी, पक्षी, विविध जीवजंतू असतात. त्यांच्या हालचालीविषयी मानवांमध्ये नेहमी कुतूहल वाटत आले आहे. त्यातूनच मग वेगवेगळ्या कथा प्रसूत होत असतात. जसे घुबड हा पूर्ण मान फिरवतो. त्याची नजरानजर झाल्यास गर्भवती महिलेस धोका संभवतो. पण या केवळ आख्यायिका असून त्यात तथ्य नसल्याचे पक्षी अभ्यासक स्पष्ट करतात.तसेच या एका पक्ष्याबाबत एक वदंता आहे. हरियाल किंवा हरोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्यास महाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तर हा पक्षी जमिनीवर कधीच पाय ठेवत नाही, असा समज आहे. पिवळ्या पायाची हरोळी, इंग्रजीत यलो फुटेड ग्रीन पिजन, २००४ साली राज्यपक्षी म्हणून घोषित झाला. पण जमिनीवर कधीच उतरत नाही, असा समज आहेच. पण तो पूर्णतः चुकीचा असल्याचे पक्षीतज्ञ वारंवार सांगतात.

प्रत्येक सजीवास पाणी आवश्यक आहे. पाण्यातील मासे सुद्धा त्वचेद्वारे तसेच श्वास प्रक्रियेतून पाणी घेतात. हरियाल पक्षी संपूर्ण भारतात दिसतो. शहर, शेत, जंगल सर्वत्र त्याचा वावर असतो. पिंपळ, वड, उंबर तसेच बहुतांश झाडाची फळे त्यास आवडतात. या फळात पाणी व अन्य घटक असतात. त्यामुळे पाण्याची कमतरता भरून निघते. तसेच जमिनीवर पडलेले धान्य सुद्धा खातो, असा संदर्भ प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. राजू कसबे यांच्या पुस्तकात आहे.

येथील बहार नेचर संस्थेचे पदाधिकारी व नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय येथे जीव शास्त्रज्ञ पदावर कार्यरत दर्शन दुधाने सांगतात की, हरियाल पक्षी जमिनीवर कमी येतो. त्यामागे त्याचा आहार हे प्रमुख कारण आहे. फळे खात असल्याने त्याची पाण्याची गरज कमी होते. आहारातून पाण्याची कमतरता भरून निघते. पण जमिनीवर पायच ठेवत नाही, पानावरील पाणी पितो, हे मात्र गैरसमज आहेत. भारतात व शेजारी देशात ग्रीन पिजन किंवा हरियालच्या नऊ प्रजाती आढळतात. या सर्व प्रजातीपेक्षा पिवळ्या पायाचा हरियाल तुलनेने अधिक प्रमाणात जमिनीवर पाणी पिण्यास उतरतो. असा पक्षी शास्त्रज्ञाचा अभ्यास आहे. कृत्रिम पाणवठे तपासल्यास हरियाल नक्की दिसून येईल, असे दुधाने नमूद करतात व नेहमी हवेतच असतो असा दावा खोडून काढतात.