नागपूर : संसदेत रामदास आठवले यांच्या कवितांनी मनोरंजन होत असले तरी समाजाची मान मात्र शरमेने खाली जाते, असे प्रतिपादन ‘दी रिपब्लिकन’ संघटनेचे प्रवक्ते हर्षवर्धन ढोके यांनी व्यक्त केले.
दी रिपब्लिकन या संघटनेच्यावतीने रमाई आणि माईसाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा नुकताच विदर्भ साहित्य संघात पार पडला. अध्यक्षस्थानी हर्षवर्धन ढोके होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन विचारवंत कपिल सरोदे, सामजिक कार्यकर्त्यां डॉ. पूजा नाखले, रमाईचे नातू दीपक धोत्रे, माईसाहेबांचे तत्कालीन सहकारी सुहास सोनवणे व्यासपीठावर होते. यावेळी हर्षवर्धन म्हणाले, रामदास आठवले संसदेमध्ये जयभीम, जय रिपब्लिक इंडिया म्हणतात तेव्हा अभिमानाने उर दाटून येतो. पण जेव्हा ते ‘काँग्रेसने दिला धोका आणि मोदीमुळे मंत्रिपदाचा मिळाला मोका’सारख्या कविता सादर करतात तेव्हा मात्र शरमेने मान खाली घालवी लागते. संसदेत कसे बोलावे हे देखील निवडून आलेल्या प्रतिनिधीला कळत नसेल तर त्यांनी अनुसूचित जाती, जमातीचे नेतृत्व संसदेत करू नये.
रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व माईसाहेब आंबेडकर यांच्या हाती गेले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र, तत्कालीन लोकांना नेतेगिरी धोक्यात येईल, असे वाटल्याने त्यांनी माईंची बदनामी केली आणि त्यांना अज्ञातवासात राहण्यास भाग पाडले. डॉ. पूजा नाखले यांनी रमाई आणि माईंच्या कार्यावर भाष्य केले. दीपक धोत्रे यांनी रमाईच्या तर सुहास सोनवणे यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन परिणिता गायगोले आणि प्रकाश कदम यांनी केले.
प्रास्ताविक ‘दी रिपब्लिकन’ संघटनेचे अध्यक्ष रवि ढोके यांनी केले. विकास शिंदे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सचिन गजभिये यांनी आभार मानले.