नागपूर : नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाच दिवसानंतर दंगलग्रस्त भागाची पाहणीसाठी एक समिती स्थापन केली आहे.काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल व शांतता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
काँग्रेसची समिती नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाऊन पाहणी, स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेसचेचे सचिव प्रफुल्ल गुडधे हे समन्वय आहेत.दरम्यान, दंगलीनंतर आज तिसऱ्या दिवशी चिटणवीसपुरा चौक, महाल आणि आसपासपच्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संचारबंदी देखील कायम असून भालदारपुऱ्यातील युवकांना संशयित म्हणून ताब्यात घेण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले.पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी सोमवारी रात्रीपासून जाहीर केली. बुधवारी देखील संचारबंदी कायम असून दंगलीतील संशयितांना पडकण्याची शोध मोहीम राबण्यात येत आहेत.महाल, इतवारी, गांधीबाग, लकडगंज, कोतवाली या परिसरातील बाजारपेठा कडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवानाना तैनात केले आहे. शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील या काही निवडक लोकवस्त्या वगळता नागपूर शहरात इतरत्र सामान्य जीवन आहे.