नागपूर : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले वैदर्भाीय हर्षवर्धन सपकाळ हे या पदावर विराजमान होणारे विदर्भातील आठवे नेते आहे. एकूण दहावेळा हे पद विदर्भाच्या वाट्याला आले होते. त्यापैकी दोघांना दोन वेळा संधी मिळाली. सपकाळ यांच्यापूर्वी हे पद सांभाळणारे नाना पटोले हे विदर्भाचे होते. सपकाळ यांच्या निमित्ताने हे पद विदर्भात कायम राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आबासाहेब खेडकर यांची नियु्क्ती करण्यात आली होती. ते १९६० ते १९६३ असे तीन वर्ष त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली. ते अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील होते. ग्रामविकास मंत्रीही होते. त्यानंतर १९७८-१९७९ या काळात कट्टर विदर्भवादी नासिकराव तिरपुडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. तिरपुडे नागपूरचे होते. १९८८ ते १९८९ या काळात प्रतिभा पाटील यांच्याकडे ही जबाबदारी आली. पुढच्या काळात त्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या होत्या. वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभाताई राव यांनी १९८५ ते १९८८ आणि २००४ ते २००८ अशा दोन वेळा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली, राव यांच्या प्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्याकडेही दोन वेळा प्रदेशाध्यक्षपद आले. ते १९९७ ते १९९८ आणि २००३- २००४ या काळात प्रदेशाध्यक्ष होते. यवतमाळ जिल्ह्यातील माणिकराव ठाकरे यांनाी २००८ ते २०१५ या काळात या पदावर काम केले. भंडारा जिल्ह्यातील नाना पटोले यांच्याकडे २०२१ मध्ये या पदाची जबाबदारी आली. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून या पदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी गुरुवारी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आतापर्यंत दहावेळा प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडे आले. त्यात दोन नेत्यांना दोन वेळा हे पद मिळाले.