नागपूर: बुलढाणा जिल्ह्यातील काही गावात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर टक्कल पडत असल्याचे पुढे आले होते. या प्रकरणाची दखल केंद्र व राज्य शासनाने घेत येथे विविध तज्ज्ञांच्या समित्या पाठवल्या होत्या. परंतु अद्यापही केस गळतीवर सरकारकडून स्पष्टीकरण आले नसल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या भागातील रेशनच्या गव्हात आढळलेल्या अपायकारक घटकावरही त्यांनी भाष्य केले आहे.

डिसेंबरच्या पंधरवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १९ गावात केस गळतीमुळे टक्कल पडण्याचे प्रकार पुढे आले. त्याचे शास्त्रीय कारण सरकार देत नाही. आता सरकार  केस परत येत असल्याचे सांगते. परंतु  कारण देत नसल्याने यासाठी कोणते तेल वापरले असे विचारावे का, असा सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. ज्या भागात केस गळती झाली तो खारपाणपट्टा आहे. सरकारने चौकशी केली पण त्यासंदर्भातला आयसीएमआरचा अहवाल अजून आलेला नाही. सरकराने आयसीएमआरकडे माणूस पाठवला नसल्याने ते अहवाल बदलण्याचा प्रयत्न करत असल्याची शंकाही सपकाळ यांनी वर्तवली. पद्मश्री डॉ. हिम्मतराव साळुबा यांच्या अहवालाबाबतही सपकाळ यांनी सांगितले.

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या अहवालात काय?

डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांनी बुलढाणा परिसरातील त्वचेचे, नखाचे, मातीचे व रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे नमुने प्रयोगशाळेत तपासून अहवाल सरकारला दिला. हा प्रकार सार्वजनिक वितरण प्रणालीतील गव्हामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळून आले आहे ते तब्बल १४ टक्के पेक्षा जास्त आहे. सेलेनियम १.९ टक्के पर्यंत हानीकारक नाही पण सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे मळमळ येणे, खाज येणे, मधुमेहाच्या तक्रारी येतात, असे संशोधन आहे आणि यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोहचले व तसा पत्रव्यवहार बावस्कर यांनी शासनाशी केला. पण सरकारने त्यांच्या अहवालाला केराची टोपली दाखवल्याचे सपकाळ म्हणाले.

बावस्करांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून अपशब्द

हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री देण्याची शिफारस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे. अशा सन्माननीय बावस्कर यांना काय कळते, असे उद्दाम वक्तव्य जिल्हाधिकारी करतात. आम्ही येथे कशासाठी बसलो आहोत, असे तो बोलतात. जिल्हाधिकारी हे सरकारी नोकरी करत आहेत. त्यांना हे शोभत नाही. त्यांचा बोलवता धनी सरकार असल्याचाही आरोप सपकाळ यांनी केला.