नागपूर : अनेक जण बँकेचे खाते, एटीएम, क्रेडिट कार्ड, पेटीएम, गुगल पे आणि अन्य पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड वारंवार टाकावा लागत असल्यामुळे सोपी जावा म्हणून जन्मतारीख, वाहनाचा क्रमांक, जन्मवर्ष, लग्नाचे वर्षे, मुलाचे नाव, मुलांची जन्मतारीख किंवा पहिले नाव-जन्मवर्ष ठेवतात. मात्र, असे पासवर्ड ठेवल्यास सायबर गुन्हेगार तुमचे बँक अकाऊंट काही क्षणात रिकामे करू शकतात. आतापर्यंत अनेकांचे सायबर गुन्हेगारांनी पैसे परस्पर आपल्या खात्यात वळते करून फसवणूक केली आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने सादर केलेल्या अहवालातून माहिती समोर आली आहे.

अनेक बँकेचे ग्राहक आपल्या एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डचा पासवर्ड लक्षात राहावा म्हणून सोपा पासवर्ड ठेवतात. त्यामुळे अनेकदा व्यवहार करताना अडचणीचे जाऊ नये. त्यामुळे कठीण पासवर्ड विसरल्यास खरेदी करताना किंवा अन्य ठिकाणी बील भरताना अडचणीचे ठरू नये म्हणून सोपा पासवर्ड ठेवतात. त्यात आपली जन्मतारीख, मुलाचा जन्मतारीख, कार किंवा दुचाकीचा क्रमांक, पहिले नाव आणि जन्मवर्ष, लग्नाचे वर्षे किंवा मुलाचे नाव असे सोपे पासवर्ड ठेवतात. असे पासवर्ड हॅक करणे सायबर गुन्हेगाराला सोपे जाते. समाजमाध्यमावरील फेसबूक, इंस्टाग्रामवरून नाव, गाडी क्रमांक, जन्मतारीख आणि अन्य कौटुंबिक माहिती गोळा केली जाते. त्यातून पासवर्डचा शोधण्याचा प्रयत्न केल्या जाते. त्यातून एखादा पासवर्ड जुळला की बँक खाते रिकामे केले जाते. अशा प्रकारच्या फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

हेही वाचा – हे सर्पमित्र की आधुनिक गारूडी ! आठ बळी गेले, पण वनखाते ढिम्मच; पशुप्रेमी संतप्त

सोशल मीडियातून डाटा तयार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सायबर गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. अनेकांच्या खात्यातून लाखो रुपये सायबर गुन्हेगारांनी आपल्या खात्यात वळते करून फसवणूक केली आहे. आता सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप अशा नामांकित अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार अनेकांचा डाटा तयार करतात.

महिलांची सर्वाधिक फसगत

सायबर गुन्हेगारांकडून महिलांची सर्वाधिक फसवणूक करण्यात आली आहे. कारण, महिला अनेकदा अगदी सहज आणि सोपा असणारा पासवर्ड एटीएम-क्रेडिट कार्डला ठेवतात. अनेकदा १२३४५६ किंवा नाव आणि जन्मतारीख असे अगदी सोपे पासवर्ड ठेवतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या रडारवर सर्वाधिक महिला असतात.

हेही वाचा – डेंग्यू व चिकनगुनिया आजारावर दुर्लक्षित वनस्पतीद्वारे नियंत्रण! या संशोधनामुळे…

या गोष्टी लक्षात ठेवा

किमान ८ ते १५ अक्षरे असलेला सुरक्षित पासवर्ड ठेवावा. यामध्ये अंक, स्पेशल कॅरेक्टर्स आणि चिन्हे आणि अक्षरे ठेवावित. जेणेकरून पासवर्ड पूर्णपणे सुरक्षित राहील. वेळोवेळी पासवर्ड बदलत राहायला हवे जेणेकरून पासवर्ड हॅक होणार नाही. पासवर्डसह दोन ‘स्टेप ऑथेंटिकेशन फीचर’ देखील वापरावे, जेणेकरून तुमचे खाते हॅक होण्यापासून वाचवता येईल.