खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकार विरोधात आंदोलन अधिक तीव्र करून प्रसंगी मंत्र्यांना चोप देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.
राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पाहणीसाठी सध्या शेट्टी विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे रविभवनमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शासनाने १५५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे, परंतु याची दाहकता यापेक्षा अधिक आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली असून रब्बी पिकेही हातून गेली आहेत.
मध्यंतरी केंद्राचे पथक राज्यात पाहणीसाठी आले असता त्यांना मराठवाडय़ातूनच माघारी परतावे लागले. ते विदर्भाकडे फिरकलेही नाहीत, त्यामुळे या भागाचे वास्तव त्यांना माहित नाही. त्यातच पीकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ घोषित झाल्यावरही विमा रकमेच्या २५ टक्के रक्कम एकाही कंपनीने दिलेली नाही. शासन या कंपन्यांवरही कारवाई करत नाही. काही भागात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने न सोडवल्यास मंत्र्यांना अडवून त्यांना चोपून काढायला स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे-पुढे बघणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
एकाला रामाची, दुसऱ्याला गायीची चिंता
राज्यात सत्तेवरील एका पक्षाला रामाची तर दुसऱ्याला गायीची चिंता आहे. शेतकऱ्यांची चिंता कुणाला नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. २०१९ ची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
गडकरींना टोला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांना उसापासून इथेनॉलचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन करतात. प्रत्यक्षात पेट्रोलियम कंपन्या इथेनॉल घेत नाहीत. देश स्वप्नरंजनावर नव्हे तर अर्थकारणावर चालत असल्याचा टोला शेट्टी यांनी गडकरींना लगावला.
७ जागांची मागणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे सात जागांची मागणी केल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, धुळे, बुलढाणा, वर्धा आदींचा समावेश आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशीही आघाडीबाबत चर्चा सुरू असून तेही आघाडीत येण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.