गडचिरोली: गृहविभागाच्या सहसचिवांच्या नावे पोलीस अधीक्षकांना ई- मेलद्वारे दोन अंमलदारांच्या बदल्यांचे बनावट आदेश दिल्याचे धक्कादायक प्रकरण महिनाभरापूर्वी घडले होते. याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून हा बदली आदेश एका महिला अंमलदाराच्या पतीनेच पाठविल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी संदीप मड्डेलवार याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता. यात पोलीस मदत केंद्र धोडराज येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नक्षल सेल व पोलीस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता. त्याखाली सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव व स्वाक्षरी होती. गृहविभागाच्या नियमित ई- मेलवरून हा मेल आला नव्हता.
हेही वाचा >>> अमरावती : पायावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
शिवाय अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागातून निघत नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. त्यांनी सायबर विभागाकडे चौकशी सोपवली. उपनिरीक्षक सागर आव्हाड यांनी गृहविभागात जाऊन चौकशी केली असता हा मेल त्यांनी पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली ठाण्यात फसवणूक व माहिती – तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला, त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी तपासचक्रे गतिमान केली.