गोंदिया : सडक/अर्जुनी तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये एका विध्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकावर अखेर गुन्हा दाखल करीत तपासानंतर त्यांना अटक करून त्यांची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सविस्तर वृत्त असे की, गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा जमी. येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे (वय ४७ वर्ष) रहिवासी कोल्हारगाव यांच्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका विध्यार्थिनीशी त्यांनी अश्लील चाळे केले आहे. एकंदरीत ही घटना संपूर्ण शिक्षण विभागाला लाजवणारी आहे. काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेच्या एका विध्यार्थिनीबरोबर त्यांचा एक छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारीत झाला होता. त्या अनुषंगाने प्राप्त माहिती मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्यांना निलंबितदेखील केले होते. तर तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारीदेखील त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकाला जाब विचारण्यासाठी गेले होते. या संघटनेच्या मदतीने अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक केदार मार्तंड गहाणे यांच्या विरोधात ३५४ ए, ३५४ डी, ५०६ तसेच पोक्सो कलम १०, १२ आणि अनुसूचित जाती जमाती कायदा (ॲट्रॉसिटी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला डूग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर करत आहेत.

हेही वाचा – नागपूर : ‘सिस्टीक फायब्रोसिस’चे निदान मुलांच्या घामातून शक्य; दिल्ली एम्सकडून मदत मिळणार

पीडित मुलगी ही श्रीकृष्ण आदिवासी आश्रम शाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी येथे शिकत आहे. तक्रारदार विध्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, आरोपी मला ऑफिसमध्ये बोलावून रजिस्टर लिहिण्याच्या बाहण्याने पायाला पाय लावून वाईट उद्देशाने स्पर्श करत होता. त्यांनी नियमित हा क्रम सुरू ठेवला होता. तक्रारीवरून डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे विविध कलमांअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे या आश्रमशाळेत पालक आपले मुलंमुली शिकवणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

हेही वाचा – यवतमाळ: दरोड्याच्या प्रयत्नातील नऊ जणांना अटक; आर्णी पोलिसांची कारवाई

विध्यार्थिनीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली व न्यायालयात हजर केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Headmaster arrested for wrong behaviour with student in ashram school sar 75 ssb