नागपूरच्या निशिद गायकवाडला अटक; अटकेतील भाजपच्या संजय सानपबरोबर संबंध

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेश गोंडाणे

नागपूर : आरोग्य विभाग ‘गट क’चा २४ ऑक्टोबरला झालेला पेपरही फुटल्याचे पुणे पोलिसांनी मंगळवारी उघड केले असून याची पाळेमुळे विदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातून निशिद रामहरी गायकवाड याला पुणे पोलिसांनी अटक केली असून आरोग्य विभागाच्या ‘गट-क’चा पेपर त्याने फोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, आधीच अटकेत असलेल्या बीड जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचा पाटोदा येथील माजी अध्यक्ष संजय सानप याच्या सांगण्यावरून निशिद गायकवाड काम करत असल्याची माहिती आहे.

मूळचा अमरावती येथील रहिवासी असलेला निशिद गायकवाड हा मागील काही वर्षांपासून नागपुरात राहत होता. येथे भाडय़ाने एका वसाहतीमध्ये राहण्यासाठी त्याने खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याचे सांगितले होते. नागपुरात राहून गायकवाडने विदर्भात आपले जाळे पसरवले होते. येथे राहून विविध शिकवणी वर्गाशी संपर्क साधणे, तेथील विद्यार्थ्यांना नोकरी लावण्याचे आमिष देणे अशी कामे निशिद गायकवाड करीत असे. मंगळवारी पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ ऑक्टोबरला झालेला आरोग्य विभागाचा ‘गट क’ चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी देखील सहभागी होते असा खुलासा पोलिसांनी केला. या पेपर फुटीची पाळेमुळेच विदर्भात खोलवर रुजल्याची माहिती आहे. भाजप नेता संजय सानप यालाही आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्यांच्या माध्यमातूनच पोलिसांना नागपुरातील या निशिद गायकवाडचा शोध लागाल आहे. आरोग्य विभागाचा ‘गट क’चा पेपर फोडण्यामागे या गायकवाडचा मोठा हात असल्याचे पुणे पोलिसांनी शोधून काढले असून या प्रकरणात गायकवाडला न्यायालयासमोरही हजर करण्यात आले आहे.

अनेक वर्षांपासून हेच काम

आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात निशिद गायकवाड याचे नाव समोर आले असले तरी पैसे घेऊन नोकरी लावून देण्याचे काम तो अनेक वर्षांपासून करीत असल्याची माहिती समोर आली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांशी संपर्क करणे, पैशाची बोलणी करून त्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवणे अशी काम तो करीत असे. नागपुरात राहून संजय सानप याच्या इशारावरून निशिद गायकवाड हे सर्व काम करीत असल्याची माहितीही समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health recruitment group c paper falling vidarbha ysh